आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात प्रचंड राजकीय उलथापालथ होताना दिसत आहे. रणसंग्रामाचा बिगूल वाजण्याआधीच पक्षांतराची धामधूम जोरात असून, विरोधी पक्षांतील अनेक बडे नेते सत्ताधार्यांकडे विशेषत: भाजपकडे आकर्षित होत असल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बदललेल्या समीकरणांचा हा परिपाक आहे.
देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार केंद्रात सलग दुसर्यांदा सत्तेवर आले आणि खंडप्राय भारताचे राजकीय चित्र पूर्णपणे पालटले. या निवडणुकीत भाजपला देदिप्यमान यश मिळाले. त्याचे परिणाम देशभरात दिसू लागले. दक्षिणेतील प्रमुख राज्य कर्नाटकमध्ये काँग्रेसचे आठ आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) तीन असे मिळून एकूण 11 आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने तेथील आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर न्यायालयीन लढाईत भाजपने बाजी मारून ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी केले. मग विश्वासदर्शक ठराव जिंकून बी. एस. येडियुरप्पा चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. कर्नाटकपाठोपाठ शेजारील गोवा राज्यात राजकीय भूकंप झाला. ज्या गोव्यात सरकार स्थापनेसाठी भाजपला कसरत करावी लागत होती, तेथील विरोधी पक्षनेत्यासह काँग्रेसच्या 10 आमदारांनी भाजपचे नेतृत्व स्वीकारले. त्यामुळे गोव्यातील भाजप सरकार आणखी मजबूत झाले आहे. ईशान्येकडील प्रमुख राज्य असलेल्या सिक्किममध्येही भाजपचा शिरकाव झाला असून, सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट (एसडीएफ)च्या 10 आमदारांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. भाजपच्या वाढत्या प्रभावाचा झटका तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जींना आधीच बसलेला आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूलचे तीन आणि माकपच्या एका आमदाराने, तसेच सुमारे 60 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर गुजरात व अन्य काही राज्यांतील आमदारही भाजपकडे आकर्षित झालेले आहेत.
अशा प्रकारे संपूर्ण देशात भाजपमध्ये दाखल होण्याचा ओढा वाढला आहे. महाराष्ट्रात तर भाजपप्रवेशासाठी नेत्यांची रांग लागली आहे. सर्वप्रथम राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मधुकरराव पिचड, त्यांचे पुत्र विद्यमान आमदार वैभव पिचड, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार संदीप नाईक, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी भाजपची वाट धरली. मग राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आमदार राणा जगजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनीही भाजपचा ध्वज हाती घेतला, तर चारच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील नेते, माजी मंत्री गणेश नाईक आणि काँग्रेस नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करून आपापल्या पक्षांना धक्का दिला. हे कमी म्हणून की काय छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि सातार्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपचे अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, रामदास आठवले आदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. आतापर्यंत राज्यातील आमदार भाजपमध्ये प्रवेश करीत होते, पण उदयनराजेंच्या रूपात खासदारही भाजपमध्ये दाखल होत असल्याचे पाहावयास मिळाले. येत्या काळात आणखी बडे नेते भाजपमध्ये आल्यास नवल वाटायला नको.
भाजपमध्ये मेगाभरती होत असताना मित्रपक्ष शिवसेनेतही काही प्रवेश होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील नेते आमदार जयदत्त क्षीरसागर, सोलापुरातील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मंत्री सचिन अहिर, इगतपुरीतील काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित, काँग्रेसचे सिल्लोडमधील आमदार अब्दुल सत्तार, शहापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा, बोईसरचे बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे, राष्ट्रवादीचे श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांसारख्या नेत्यांनी शिवसेनेची कास धरली, तर राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री व गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी 11 वर्षांनी ‘घरवापसी’ केली.
सत्ताधारी पक्षांमध्ये मेगाभरती सुरू असताना स्वाभाविकच विरोधकांमध्ये मेगागळती होत आहे. याचा सर्वात जास्त फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे. पक्षांतरामुळे राष्ट्रवादीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काँग्रेसही पार गोंधळून गेली आहे. पक्षप्रवेशापासून आपल्या नेत्यांना कसे रोखायचे याचे उत्तर त्यांच्याकडे नाही, ना पक्षवाढीसाठी कुठला कार्यक्रम. खरे तर लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विरोधी पक्षांनी जोमाने काम करणे अपेक्षित होते, मात्र लढायचे सोडाच उलट वर्चस्वाच्या अंतर्गत गटबाजीत ते मश्गूल आहेत. परिणामी कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत.
राज्यात होत असलेल्या मेगाभरती आणि मेगागळतीमागे येत्या काळात होणारी विधानसभा निवडणूक हे कारण सर्वश्रुत आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा राज्यात येणार याचाही अंदाज एव्हाना सर्वांना आलेला आहे. आता भाजप, शिवसेना यांची युती होईल की नाही, हे अद्याप स्पष्ट व्हायचे बाकी आहे. असे असले तरी दोन्ही पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यावर पक्षांतराला आणखी वेग येईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धडाका
विरोधक कोमात असताना सत्ताधारी जोमात आहेत. विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारमुक्त कारभारातून आपला वेगळा असा ठसा उमटविला आहे. सुरुवातीला ते मुख्यमंत्रीपद कितपत पेलतात, याबाबत शंका उपस्थित केली जात होती, परंतु फडणवीस यांनी युतीचे सरकार मागील पाच वर्षे समर्थपणे चालविले. जनकल्याणकारी योजना राबवून, विकासात्मक निर्णय घेऊन त्यांनी राज्यकारभाराचा गाडा उत्तम हाकला. सध्या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून ते महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. त्यांना जनतेचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. दुसरीकडे, उसने अवसान आणून विरोधकांनीही यात्रा काढल्या आहेत. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, तर काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा राज्यात फिरत आहे, मात्र मुख्यमंत्र्यांच्या यात्रेच्या तुलनेत विरोधकांच्या यात्रा फिक्या पडल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
-समाधान पाटील (मो. क्र. 9004175065)
RamPrahar – The Panvel Daily Paper