मुंबई : प्रतिनिधी
मेट्रोचे कारशेड आरेमधून कांजूरला हलविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे हा प्रकल्प तर लांबणारच शिवाय सरकारी तिजोरीवर ताणही येणार आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस म्हणाले की, कारशेड कांजूरमार्ग येथे स्थानांतरित करून मेट्रो-3चे प्रश्न सुटणार नाहीतच, शिवाय मेट्रो-3 आणि 6 अशा दोन्ही मेट्रोंच्या फेर्या मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहेत. मेट्रो-6च्या आरे ते कांजूरमार्ग या भागात विविध मार्गांवरील मिश्र रेल्वे वाहतुकीमुळे मेट्रो-6च्या कार्यान्वयनात प्रचंड गुंतागुंत निर्माण होईलच तसेच याचा मेट्रो-3वरही परिणाम होईल आणि या दोन्ही मेट्रोंच्या कार्यान्वयीन क्षमतेवर परिणाम होईल, शिवाय नुकसानही वाढेल.‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी म्हणतात त्याप्रमाणे हा नो-कॉस्ट नाही तर नो-मेट्रो प्रस्ताव! टनेलची 76 टक्के कामे पूर्ण झाली, पण कार डेपो चार-पाच वर्षे असणार नाही. या प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहार्यतेची ही अखेर. वाढीव किंमतीचा भार शेवटी ग्राहकांच्या खिशातूनच वसूल होणार, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. पर्यावरणासाठी संघर्ष करणार्यांचा मी सन्मानच करतो, पण आरे कारशेडची जागा ही कोणताच अन्य पर्याय शिल्लक न राहिल्याने निश्चित करण्यात आली होती. आता हेच पर्यावरणवादी मिठागराच्या जागेवर, कांदळवन असलेल्या जागेवर, वन संरक्षित जागेवर कारशेड उभारली जाण्याचे समर्थन करणार का, असा सवालही फडणवीस यांनी विचारला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper