Breaking News

मेडिकल कॉलेज अॅडमिशनच्या बहाण्याने 22 लाख उकळले

पनवेल : वार्ताहर

एमडी जनरल मेडीसीन या अभ्यासक्रमाकरीता अ‍ॅडमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने पनवेलमध्ये राहाणार्‍या व्यक्तीकडून तब्बल 22 लाख रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. अमेय विनायक कस्तुरे असे या भामट्याचे नाव असून पनवेल शहर पोलिसांनी त्याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला आहे.

भामट्या अमेय कस्तुरे याने वर्षभरापूर्वी कोल्हापूर येथील डॉक्टरकडून अशाच पद्धतीने 48 लाख रुपये उकळले आहेत. त्यामुळे कळंबोली पोलिसांनीदेखील त्याच्यावर वर्षभरापूर्वी फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल आहे. 

या प्रकरणातील तक्रारदार मांगीलाल राठोड हे पनवेल भागात राहाण्यास असून त्यांचा मुलगा सुरेंद्र याने परदेशातून एमडी फिजीशीयन ही पदवी घेतली असल्याने त्याला एमडी जनरल मेडीसीनचे शिक्षण पूर्ण करायचे होते. त्यासाठी सुरेंद्र याने 2018-19 या वर्षात नीटची परीक्षादेखील दिली होती. या परीक्षेनंतर सुरेंद्रचे एपीयर म्हणून मेरिट लिस्टमध्ये नावदेखील आले होते, मात्र त्याचा कोणत्याही कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशनसाठी नंबर लागला नव्हता. त्यामुळे सुरेंद्रसाठी मेडीकल कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन मिळविण्याच्या प्रयत्नात राठोड होते. त्यावेळी भामट्या अमेय कस्तुरे याने राठोड यांना संपर्क साधुन त्यांच्या मुलाला नाशिक येथील वसंतराव पवार मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमिशन मिळवून देतो असे सांगून लाखो रुपये उकळले. मुलाचे कुठेही ऍडमिशन केले नाही. त्यामुळे राठोड यांना त्याच्या वागण्यावर संशय आल्याने त्यांनी कस्तुरे याच्याकडे आपले पैसे परत मागितले. त्यामुळे कस्तुरे याने 10 लाख रुपयांचे दोन चेक राठोड यांना दिले, मात्र दोन्ही चेक बाऊन्स झाले. त्याबाबत राठोड यांनी विचारणा केल्यांनतर त्याने उडवा-उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे राठोड यांनी मार्च-2020 मध्ये अमेय कस्तुरे याला वकिलामार्फत नोटीस पाठविल्यानंतर कस्तुरे याने राठोडच्या घरी जाऊन आठ दिवसांत त्यांचे पैसे परत करण्याची विनवणी केली. त्यानंतर त्याने आपले मोबाइल फोन बंद करुन पलायन केले.

अमेय कस्तुरे याने फसवणुक केल्याचे लक्षात आल्यानंतर राठोड यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या भामट्या विरोधात फसवणुकिचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला आहे. भामट्या अमेय कस्तुरे याने याआधी देखील अनेक मुलांकडून पैस उकळले आहेत. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हादेखील दाखल आहेत.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply