माद्रिद : वृत्तसंस्था
लिओनेल मेस्सीने जादुई खेळाचे दर्शन घडवत केलेल्या दोन गोलच्या बळावर बार्सिलोनाने ईस्पानयोलवर 2-0ने मात केली, तसेच ला लिगा फुटबॉलमध्ये प्रतिस्पर्धी संघांपेक्षा 10 गुणांची भक्कम आघाडी मिळवली आहे.
ईस्पानयोल संघाने सामन्याच्या पूर्वार्धात अत्यंत निकराची झुंज दिली. मेस्सीसह अन्य आक्रमकांच्या आक्रमणांना ईस्पानयोलने रोखले. बार्सिलोनाचे आक्रमण यशस्वी होणार नाही, याची ईस्पानयोलच्या बचाव फळीने सातत्याने काळजी घेतली, मात्र उत्तरार्धात बार्सिलोनाने त्यांच्या आक्रमणाची धार अधिकच वाढवत नेली.
अखेरीस सामन्याच्या 71व्या मिनिटाला मेस्सीने एक अफलातून गोल नोंदवत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ईस्पानयोलच्या आक्रमकांनी बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना अपयश येत असतानाच बार्सिलोनाला 19 यार्डावरून एक फ्री किकची संधी मिळाली. सामना संपण्यास अवघा एक मिनिट बाकी असताना मेस्सीने त्या संधीचा अचूक फायदा उठवत पुन्हा त्याच्या जादूची कमाल दाखवून बार्सिलोनाला 2-0 असा विजय मिळवून दिला. त्यामुळे मेस्सीकडे पूर्वीइतकीच जादू कायम असल्याचे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले.
RamPrahar – The Panvel Daily Paper