Breaking News

मैत्रीतून सुवर्णमध्य

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा सध्या सार्‍या जगाचे लक्ष वेधून घेतो आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे सोमवारी सकाळी सहकुुटुंब सहपरिवार आगमन झाले. तेव्हापासून टीव्ही वाहिन्यांना उसंत मिळालेली नाही आणि सोशल मीडिया तर विविध स्वरुपाच्या प्रतिक्रियांनी ओसंडून वाहू लागला आहे. ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मैत्री सर्वश्रुत आहे व त्यांच्या मैत्रीची ‘केमिस्ट्री’ सर्वांच्याच कुतुहलाचा विषय ठरली आहे. पाच महिन्यांपूर्वी अमेरिकेत ह्युस्टन येथे विशाल स्टेडियमवर झालेल्या ‘हाऊडी मोदी’ या शानदार कार्यक्रमाद्वारे मोदी यांचे दिलखुलास स्वागत करण्यात आले होते. एखाद्या रॉकस्टारलाच लाभावी अशी लोकप्रियता मोदी यांना देशाबाहेर देखील आहे याचे तेव्हा प्रत्यंतर आले होते. अशाच धर्तीचे किंबहुना त्याहून अधिक नेत्रदीपक असे स्वागत ट्रम्प यांच्या वाट्याला आले असेच म्हणावे लागेल. अहमदाबादच्या विमानतळावर ट्रम्प यांचा परिवार उतरला तेव्हा तब्बल 22 किमी लांबीचा रोड शो करत ट्रम्प आणि मोदी हे दोघेही मोटेरा स्टेडियमवर पोचले. मोटेरा हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे आणि ते गर्दीने जवळपास पूर्ण भरून गेले होते. अशा जबरदस्त स्वागतामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारावून जाणे साहजिकच होते. मोदी यांच्या नेतृत्वाचे गुणगान गाताना त्यांनी आपल्या निखळ मैत्रीचा निर्वाळा दिला. परंतु त्याचवेळी ‘वाटाघाटी करताना माझे मित्र मोदी भलतेच कठोर होतात’ अशी पुस्ती देखील जोडली, ती भारतीयांसाठी निश्चितच दिलासा देणारी आहे. कारण सोमवारी झालेल्या अहमदाबाद आणि आग्रा येथील सहलींनंतर पुढील काही तास या दोन्ही दिग्गज नेत्यांना वाटाघाटींसाठीच बसावे लागणार आहे. या उभयतांच्या चर्चेमधूनच भारताचे भले साधण्यासाठी प्रयत्न होतील अशी सार्‍यांची इच्छा आहे. भारताशी भरभक्कम लष्करी करार पूर्णत्वाला नेण्याचा अमेरिकेचा इरादा आहे व त्यानुसार तो होईल अशी अप्रत्यक्ष घोषणाच ट्रम्प यांनी अहमदाबादेत केली आहे. परंतु या उभय देशांमध्ये व्यापारविषयक करार होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी प्रयत्नशील राहतील याची बहुतेकांना खात्री आहे. अमेरिकेसोबत व्यापारी करार होण्यामध्ये काही अडचणी आहेत. परंतु ट्रम्प यांच्याशी असलेली आपली मैत्री पणाला लावून पंतप्रधान मोदी देशाचा कार्यभाग साधतील यात शंका नाही. ट्रम्प यांच्या भारतभेटीचा आपल्याला उपयोग होणार आहे तो या दृष्टीनेच. अनौपचारिक भेटींमधूनच सौहार्दाचे वातावरण तयार करून सुवर्णमध्य साधायचा हेच मोदी यांचे धोरण दिसते. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, जपानचे पंतप्रधान शिन्जो आबे, रशियाचे नेते व्लादिमीर पुतिन आदी जागतिक नेत्यांशी देखील मोदी यांचे असेच उत्कृष्ट मैत्रीपूर्ण संंबंध आहेत. या आंतरराष्ट्रीय दोस्तीच्या राजकारणाचा आजवर भारताला फायदाच झालेला आहे. भारताकडे बघण्याची जगाची दृष्टी गेल्या सहा वर्षांत कमालीची सकारात्मक झाल्याचे दिसून येते. ट्रम्प यांच्या भारतभेटीचे फलित सकारात्मकच असेल यात शंका नाही.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply