विनाकारण फिरणार्यांवरही गुन्हे दाखल
पनवेल : वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आदेश लागू असूनही मॉर्निंग वॉकला जाणार्या 46 जणांवर खारघर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे विनाकारण बाहेर फिरणार्यांची वाहने जप्त करून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असले तरी काही नागरिक रस्त्यावर येत असल्याचे निदर्शनास आले आहे. खारघर पोलिसांकडून अशा नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या अंतर्गत मॉर्निंग वॉक करणारे तसेच विनाकारण फिरणार्यांवर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याचप्रमाणे वाहने जप्त करण्यात आली आहेत.
दरम्यान, कोणीही घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी एका कुटुंबातील एकाच व्यक्तीने घराबाहेर पडावे, सर्व ठिकाणी मास्क वापरावा व सोशल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रदीप तिदार यांनी केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper