Breaking News

यशश्री शिंदेच्या हत्येचा उरणमध्ये तीव्र निषेध

उरण ः बातमीदार, वार्ताहर, प्रतिनिधी
यशश्री शिंदे या 22 वर्षीय युवतीच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ रविवारी (दि. 28) उरणमध्ये असंख्य नागरिक एकवटले होते. या वेळी भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि आमदार महेश बालदी यांनी आरोपीला पकडून त्याला फाशीची शिक्षा मिळावी, अशी मागणी पोलिसांसमोर केली तसेच सर्वांनी या घटनेचा तीव्र निषेध केला.
उरण शहरातील मोरा रोड येथे महात्मा गांधी पुतळ्यापाशी घटनेचा निषेध करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्था-संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले होते. निषेध मोर्चा तेथून राजपाल नाका, चारफाटा ते परत राजपाल नाकामार्गे उरण पोलीस ठाणे येथे नेण्यात आला. या मोर्चात पुरुष व युवावर्गासह महिला भगिनींचा सहभाग लक्षणीय होता, तर उरणमधील सर्व व्यापारांनी कडकडीत बंद पाळून यशश्री शिंदेच्या हत्येचा निषेध केला.
या वेळी मोर्चेकर्‍यांनी पोलीस प्रशासनाला तपासाबाबत माहिती विचारली असता उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कोते-पाटील यांनी आरोपीचा शोध सुरू असून कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. कोणीही कायदा हातात घेऊ नका. यशश्री शिंदेच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले. सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल नेहूल यांनीही शांतता राखा. आरोपी सापडल्यावर कायदेशीर कारवाई करू, असे आश्वासन दिले.
भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या की, आरोपी कर्नाटकमध्ये पळून गेला आहे. पोलिसांच्या तीन टीम त्याचा माग काढत काढत आहेत. लवकरच हरामखोर पोलिसांच्या ताब्यात असेल, तर आमदार महेश बालदी यांनी, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी याकरिता मी कटिबद्ध आहे. यशश्री शिंदेला न्याय मिळालाच पाहिजे. पोलिसांनी आरोपीला पकडून आणण्यासाठी दोन दिवस लागतील असे सांगितले आहे. त्यांना वेळ देऊ आणि जर आरोपीला दोन दिवसांत पकडले नाही, तर बुधवारी निर्णय घेऊन गुरुवारपासून आपण बेमुदत बंद करू, रस्त्यावर बसू. मी तुमचे प्रतिनिधित्व करेन असा शब्द देतो, परंतु लवकरच आरोपी पकडल्याची बातमी मिळेल, असे सांगत जमावाला शांत केले.
पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर आरोपीला पकडण्याचे व कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply