गुवाहाटी ः वृत्तसंस्था
भारताच्या अंडर-19 विश्वविजेत्या संघाचा कर्णधार यश धुलने यंदाच्या रणजी ट्रॉफीमध्ये धमाकेदार कामगिरी सुरू ठेवली आहे. पदार्पणाच्या सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा धुल हा दिल्लीचा पहिला आणि एकूण तिसरा फलंदाज ठरला आहे. यशने गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या रणजी ट्रॉफी सामन्याच्या चौथ्या दिवशी तामिळनाडूविरुद्ध दुसर्या डावात नाबाद 113 धावांची खेळी केली. पहिल्या डावात शतकी योगदान देणार्या धुलने दुसर्या डावात 14 चौकार आणि एक षटकार लगावला. हा सामना अनिर्णित राहिला. यापूर्वी गुजरातचा नरी कॉन्ट्रॅक्टर आणि महाराष्ट्राचा विराट आवटे यांनी रणजी करंडक पदार्पणाच्या सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावली होती. 19 वर्षीय उजव्या हाताचा फलंदाज यशने मधल्या फळीतील फलंदाज म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. सलामीवीर म्हणून त्याने पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीमध्ये प्रवेश केला आणि दोन्ही डावात चमकदार कामगिरी केली. या सामन्यात दिल्लीने पहिल्या डावात 452 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात तामिळनाडू संघाने 494 धावा केल्या. दिल्लीने दुसरा डाव 228 धावांवर एकही विकेट न गमावता घोषित केला. यशशिवाय ध्रुव शौरीने दुसर्या डावात नाबाद 107 धावांची खेळी केली.
RamPrahar – The Panvel Daily Paper