Breaking News

यात्रांनाही कोरोनाचा फटका; मरीआई देवीची यात्रा रद्द

कर्जत ः बातमीदार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात संचारबंदी आणि लॉकडाऊन जारी केल्यामुळे याचा फटका अनेक पूर्वनियोजित कार्यक्रमांना बसला आहे. गावोगावी अत्यंत उत्साही वातावरणात होणार्‍या अनेक यात्रांनाही याची झळ पोहचली आहे. नेरळजवळ उल्हास नदीतिरी असलेल्या दहिवली गावात मरीआई देवीची यात्रा बुधवार 8 एप्रिल ते शुक्रवार 10 एप्रिल या कालावधीत होणार होती, मात्र कोरोनामुळे करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे नवसाला पावणार्‍या मरीआई देवीची हनुमान जयंतीला सुरू होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. पंचक्रोशीतील हजारो भाविक नवस फेडण्यासाठी दहिवली गावातील मंदिरात येतात, परंतु यंदा दहिवली गावात यात्रा भरली नाही.

सीकेपी प्रभू लोकांचे पूर्वीचे दहिवली गाव हे तेथील मरीआईच्या जागृत स्थानामुळे प्रसिद्ध आहे. दोन दिवस चालणार्‍या यात्रेत भाविक मरीआईचा नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने येतात. उल्हास नदीच्या दहिवली येथील डोहात काशीबाई देवीचे वास्तव्य असल्याचे बोलले जात असून मरीआईचा नवस फेडण्यासाठी आलेले भाविक उल्हास नदीपात्रात काशीबाई देवीला साडी-चोळी अर्पण करतात.

दोन दिवसांच्या यात्रेत नेरळ, कळंब भागातील किमान 50 गावांतील भाविक नवस फेडण्यासाठी येतात. मारुती मरीआई देवस्थान यात्रेचे कार्यक्रम वर्षानुवर्षे राबवले जातात. नामदेव घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली होणारा तीन दिवसांचा उत्सव यावर्षी होणार नाही, असे जाहीर करण्यात आले. हनुमान जयंतीनिमित्त निघणारी पालखी मिरवणूकही काढण्यात आली नाही. दिवसभर मंदिराला टाळे होते. कोणत्याही प्रकारचे नवस फेडायला कोणीही येणार नाही यावर मारुती मरीआई देवस्थान ट्रस्टकडून निर्बंध घालण्यात आले होते.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply