Breaking News

युद्ध सिनेमातील…

काश्मीरमधील पहलगाम येथे काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी अतिरेक्यांनी निष्पाप पर्यटकांवर केलेला हल्ला, त्यामुळेच देशभरात उमटलेली संतापाची लाट आणि याला तोडीस तोड म्हणून ऑपरेशन सिंदूर असे दिलेले चोख उत्तर या सगळ्यातून आता देशभरात देशभक्तीची भावना निर्माण झाली आहे. प्रसारमाध्यमातून आज याच गोष्टीची भरपूर चर्चा होणे स्वाभाविक आहेच. अशा वेळेस हिंदीतील युद्धपट हीदेखील एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहेच.
आपल्या देशात हॉलीवूडच्या दर्जाचे अस्सल थरारक युद्धपट निर्माण होत नाहीत, असे म्हणणारा एक वर्ग आपल्या देशात आहे. आज आपण पॅन इंडिया युगात आहोत. एका भाषेतील चित्रपट अन्य अनेक भाषेत डब करून अथवा इंग्लिश सबटायटल्सने जगभरातील अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत जाता येत आहे. त्यामुळे युद्धपटाचे बजेट वाढवायला काहीच हरकत नाही आणि कॉम्प्युटर व व्हीएफएक्सने युद्धाची दृश्य अतिशय प्रभावी करता येतीलच आणि आता तर चांगला कन्टेन असेल, तर त्याबाबतचे अधिकाधिक लहान लहान तपशील, संदर्भ व माहिती मिळतेय. त्याचा युद्धपट निर्मितीत फायदा होईल.
असे असले तरी आपल्याकडे निर्माण झालेल्या काही युद्धपटांनी समाजावर विशेष प्रभाव पाडला, चित्रपट रसिकांचा त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला असे दिसते आणि तेच तर महत्त्वाचे असते. यशासह सामाजिक प्रभाव ही एक वेगळी गोष्ट आहे. पूर्वी आपले चित्रपट तांत्रिकदृष्ट्या फार प्रगत नव्हते, पण दिग्दर्शकाची इच्छाशक्ती प्रबळ होती. एक पॅशन म्हणून चित्रपट निर्मितीत ध्यास होता.
चेतन आनंद निर्मिती व दिग्दर्शित ’हकीकत’ (मुंबईत प्रदर्शित 20 एप्रिल 1964) हा सर्वकालीन उत्तम युद्धपट आहे. आजही पाहताना तोच थरारक अनुभव येतो. भारत आणि चीन यांच्यात 1962 साली झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरील या चित्रपटात युद्धभूमीवरील समर प्रसंग, कधी घरची येणारी आठवण, कुटुंबाकडूनच्या पत्राची आठवण, तर कधी शत्रूच्या सैनिकाचा केलेला खातमा आणि त्याचा आनंद, तर कधी दुर्दैवाने आपल्या एखाद्या सहकारी जवानाला आलेले वीरमरण आणि तेव्हाचे दुःख अशा अनेक गोष्टी कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट स्वरूपात प्रभावीपणे साकारल्या होत्या. बलराज साहनी, विजय आनंद, धर्मेंद्र, प्रिया राजवंश, संजय खान, शेख मुख्तार, जयंत वगैरे कलाकारांच्या भूमिका चित्रपटाची आणखी एक महत्त्वाची बाजू, तर कैफी आझमी यांच्या गीतांना मदन मोहनचे संगीत ही एक मोठी जमेची बाजू. होके मजबूर मुझे, मै ये सोचकर उसके घर से चला था, जरासी आहट होती है, मस्ती मे छेड के तराने तेरे प्यार का, अब तुम्हारे हवाले वतन साथीओ ही गाणी आजही हिट आहेत. प्रत्येक राष्ट्रीय सणाला अब तुम्हारे हवाले वतन साथीओ हे गाणे रेडिओपासून लाऊडस्पीकरपर्यंत हमखास असतेच. एक प्रचंड उर्जा निर्माण करणारे असे हे देशभक्तीवरील गाणे आहे. या गाण्यासह हा चित्रपट संपतो. हकिकत चित्रपटाचा शेवट असाच करावा की नाही या विचारात दिग्दर्शक चेतन आनंद होते, पण त्यांनी तोच निर्णय कायम ठेवला व तो योग्यदेखील ठरला.
जे.पी. दत्ता दिग्दर्शित ’बॉर्डर’ (1997) हाही असाच एक माईलस्टोन युद्धपट आहे. आजच्या सामाजिक परिस्थितीत अनेक चित्रपट रसिक पुन्हा एकदा हा चित्रपट नक्कीच पाहतील.
आदित्य धर दिग्दर्शित ’उरी द सर्जिकल स्ट्राईक’ (2018) हा आजच्या मल्टीप्लेक्स व ओटीटी युगातील लक्षवेधक आणि प्रभावी असा युद्धपट आहे. यात विकी कौशल, यामी गौतमी, कीर्ती कुलहारी, परेश रावल इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट वास्तवाच्या जास्त जवळ जाणारा असाच. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणारा असा चित्रपट.
या चित्रपटांचा खास उल्लेख करायला हवा. याशिवाय अनेक युद्धपट पडद्यावर आले, येत आहेत. श्रीधर दिग्दर्शित धरती (1968), रामानंद सागर दिग्दर्शित ’ललकार’ (1972), चेतन आनंद दिग्दर्शित ’हिन्दुस्तान की कसम’ (1973), जे. ओम प्रकाश दिग्दर्शित आक्रमण (1974), वीरू देवगन दिग्दर्शित हिन्दुस्तान की कसम अशी अनेक नावे घेता येतील. मनोजकुमार, जोगिंदर यांनी दिग्दर्शित केलेल्या काही चित्रपटात युद्धाचे संदर्भ पहायला मिळतील. आर.के. फिल्म या बॅनरखाली परमवीर चक्र या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. सुधाकर बोकाडे निर्मिती व नाना पाटेकर दिग्दर्शित प्रहार चित्रपटातही युद्धाचा संदर्भ आहे. जॉन मॅथ्युज मथान दिग्दर्शित सरफरोश व अनिल शर्मा दिग्दर्शित गदर एक प्रेमकथा हे युद्धपट नाहीत. पण त्यातील पाकिस्तानवरील हल्ल्याचे स्वरुप भिन्न आहे. हे दोन्ही चित्रपट रसिकांना मोठ्याच प्रमाणावर आवडले. दोन्ही चित्रपट देशभक्तीची भावना जागी करतो आणि तेच महत्त्वाचे.
दिग्दर्शक जे.पी. दत्ता यांनी ’गुलामी’ (1985)पासून चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकले तेव्हा उत्तर प्रदेश (विशेषतः आग्रा, फतेहफूर सिकरी येथील आऊटडोअर्सचा भाग), राजस्थान (विशेषतः बिकानेर, जोधपूर वगैरे भागातील वाळवंटी प्रदेश) यावर जास्त लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले. गंमतीत असे म्हटले जाई की जे.पी. दत्ता अगोदर लोकेशन्स ठरवतो आणि मग मध्यवर्ती कथासूत्र ठरवून मग पटकथा संवाद लिहून घेतो. ’गुलामी’च्या खणखणीत यशानंतर त्याने एकामागोमाग एक अशा ’यतिम’, ’हत्यार’ आणि ’बटवारा’ या तीन चित्रपटांचे दिग्दर्शन हाती घेतले आणि एकेका चित्रपटासाठी उत्तर प्रदेश, राजस्थान येथे दीर्घकालीन शूटिंग सत्रांचा डेरा टाकला. योगायोगाने हे तीनही चित्रपट 1989 या एकाच वर्षी प्रदर्शित झाले आणि तीनही चित्रपटांना रसिकांनी नाकारले. अपयशाची हॅट्ट्रिक करणारा जे. पी. दत्ता आता काय बरे करणार असा प्रश्नच होता. अशातच एक दिवशी हाती आमंत्रण आले की, जे.पी. दत्ता दिग्दर्शित आणि ए.के. नडियादवाला निर्मित ’बन्दुआ’ या चित्रपटाचा नटराज स्टुडिओत मुहूर्त! आणि त्यावर फक्त प्रमुख भूमिकेत अमिताभ बच्चन इतकेच होते. तोपर्यंत अमिताभने आम्हा सिनेपत्रकारांवरचा बॅन उठवला नव्हता त्यामुळे त्याची भूमिका असलेल्या अशा अनेक चित्रपटांच्या मुहूर्तांना आम्ही सिनेपत्रकार आवर्जून हजर राहत असू. या ’बन्दुआ’चा मुहूर्त आजही आठवतोय. प्रचंड गर्दीत धर्मेंद्रने मुहूर्त क्लॅप दिला आणि वहिदा रहेमानची खास उपस्थिती होती. हा चित्रपट त्या मुहूर्तालाच बंद पडला.
जे.पी. दत्ता सहजी हार मानणारा नव्हता. महत्त्वाचे म्हणजे त्याच्या अतिशय शिस्तबद्ध दिग्दर्शनाखाली भूमिका साकारण्यास अनेक स्टार तयार होते. त्याने दिग्दर्शित केलेल्या ’क्षत्रिय’ (1993)ला चांगले यश लाभले आणि एक प्रकारे जे.पी. दत्ताचा कमबॅक झाला. खरंतर गुणवत्ता कायम असते, फॉर्म टेम्पररी असतो. चित्रपटाचे यशापयश प्रेक्षकांच्या हाती असले तरी खुद्द चित्रपटसृष्टीत दिग्दर्शकाची क्षमता, त्याला दृश्य माध्यमाची असलेली जाण आणि कलाकारांकडून काम करून घेण्याची पद्धत या गोष्टी चित्रपटसृष्टीला ज्ञात असतात. हे सगळे चित्रपटाच्या यशापयशाच्या पलीकडे जात असतात. ’क्षत्रिय’च्या यशानंतरचा जे.पी. दत्ताचा चित्रपट कोणता असेल याची उत्सुकता वाढली. हे एका गुणवान दिग्दर्शकाचे यश आहे.
जे.पी. दत्ता दिग्दर्शित ’बॉर्डर’ची घोषणा झाली तेव्हा एका गोष्टीची खात्री होती, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 1971 साली झालेल्या युद्धावर आधारित चित्रपट. या युद्धातील लोंगोवाल करार, भारतीय सैन्याचा विजय, जवानांना येत असलेली घरची आठवण, पत्रातून मनमोकळेपणाने भावना व्यक्त करण्याचं माध्यम, युध्धभुमिवरचे वातावरण याभोवती हा चित्रपट आहे. जे.पी. दत्ताने एकूणच या संदर्भात भरपूर माहिती मिळवली. त्या युद्धाशी संबंधित हयात असलेल्यांच्या भेटीगाठी घेतल्या. ही एक मोठी प्रक्रिया असते. प्रत्यक्ष घटनेवर आधारित चित्रपट असल्याने तर अधिकाधिक योग्य ती माहिती, तपशील, संदर्भ मिळवणे आवश्यक होते. अशा कलाकृतीत पूर्णपणे झोकून दिल्याशिवाय हे शक्य नसते. पूर्ण फोकस ठेवावाच लागतो. 1995च्या सप्टेंबरमध्ये पटकथेवर काम सुरू केले आणि ते 1996च्या एप्रिल महिन्यापर्यंत म्हणजे सात महिने चालले. हे सगळे होत असताना चित्रपटासाठी तंत्रज्ञ आणि कलाकारांची निवड याची प्रक्रिया सुरु होते. महत्त्वाचे होते ते कला दिग्दर्शन आणि छायाचित्रणकार. या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण राजस्थानातील बिकानेर आणि जोधपूर येथे करायचे होते. कला दिग्दर्शन रत्नाकर फडके यांचे तर छायाचित्रण ईश्वर बिरदी आणि निर्मल जानी यांचे आहे. या सगळ्यात भले मोठे युनिट. असा खूपच मोठा पसारा असतो. त्यासाठी टीम चांगली लागते. हे सगळे होत असताना भारतीय लष्कर आणि हवाई दल यांच्याकडून बरीच मदत झाली. थीमनुसार अनेक तपशील, गोष्टी, संदर्भ तर मिळालेच, पण युद्धातील वाहने, रायफल, मशीनगन, गणवेश यांची बरीच माहिती मिळाली. 1971च्या युद्धावर आता पंचवीस वर्षानंतर चित्रपट आकार घेत होता. त्याबरोबरच तेव्हाच्या यद्धातील सामुग्रीची माहिती महत्वाची होती. भारतीय लष्कराने पाकिस्तानी टाईप 59 सारख्या टी.55 टाक्या, ब्रेन मशीनगन, एसएलआरसारखी शस्रे, हॉकर हॅटर्स, मिग 21 याची माहिती दिली आणि मग त्यानुसार बरीच तयारी करावी लागली. इतका मोठा युद्धपट सहजी आकाराला येत नाही हेच खरे. त्यात पुन्हा अनेक कलाकारांची निवड करताना कोण कसे उपलब्ध आहे, कोणी होकार अथवा नकार देतेय हे सगळे होत होत चित्रीकरण सुरू झाले. त्यानंतर मात्र कामाने वेग घेतला. एक दर्जेदार चित्रपट घडत गेला. त्यामागचा खूप मोठा प्रवास पुढे चालत आला.
चित्रपट प्रदर्शनास सज्ज झाला असताना सर्वप्रथम गाजले ते जावेद अख्तर लिखित आणि अन्नू मलिकने स्वरबद्ध केलेल्या ’संदेसे आते है, हमे ले जाते है’ हे गाणे. आजही हे गाणे लोकप्रिय आहे. युद्ध सीमेवरील जवान आणि त्यांचे दूरवर राहत असलेले कुटुंबीय यांच्यातील संपर्काचे महत्वाचे माध्यम म्हणजे पत्र. हे एकमेकांची ख्याली खुशाली विचारणारे आणि कळवणारे पत्र म्हणजे कमालीची भावनिक ओढ. उत्कट नाते. मनमोकळ्या होत असलेल्या भावना.
’बॉर्डर’ची पूर्णतेची आणि कॅसेट रिलीजची जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमधील जंगी पार्टी मला आजही आठवतेय. एक अतिशय भव्य युद्धपट येतो आहे हे यावेळी याची गाणी पाहताना जाणवले.
या चित्रपटात सनी देओल (मेजर कुलदीपसिंह चांदपुरी), जॅकी श्रॉफ (विग कमांडर एंडी बजवा), सुनील शेट्टी (कॅप्टन शेखावत), अक्षय खन्ना (सेकंड लेफलन्ट धरमवीर) यांच्यासह राखी गुलजार, तब्बू, पूजा भट्ट, कुलभूषण खरबंदा, सुदेश बेरी, पुनीत इस्सार, राजीव गोस्वामी, अमृत पाल इत्यादींच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण इश्वर बिदरी आणि निर्मल जानी यांचे, तर संकलन दीपक विरकूड यांचे आहे. या चित्रपटातील मेरे दुश्मन मेरे भाई, हमने जबसे मुहब्बत इत्यादी गाणीही लोकप्रिय आहेत. लोकप्रिय गाण्यांमुळे एका पिढीतील चित्रपट पुढील अनेक पिढ्या ओलांडूनही हिट असतोच. आजही या चित्रपटाचा सामाजिक प्रभाव कायम आहे हे विशेषच आहे. या चित्रपटाला वीस वर्षे पूर्ण झाली तेव्हा एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मी तेव्हा त्या सोहळ्याचा अनुभव घेतला असता चित्रपटाशी संबंधित सगळेच जुन्या आठवणीत रमल्याचे आणि थोडेसे भावूकही झाल्याचे जाणवले. एखाद्या कलाकृतीशी असे जोडलेले असणे या ग्लॅमरस क्षेत्रातील एक प्रकारचे माणूसपण आहे.
’बॉर्डर’नंतरच्या दिग्दर्शक जे.पी. दत्ताच्या चित्रपटातील ’एलओसी कारगील’ (2003) आणि ’पलटण’ (2018) या युद्धपटांवर प्रचंड मेहनत घेतली, खूप खर्च केला, पण त्यांना ’बॉर्डर’ची उंची गाठता आली नाही… जे.पी. दत्ताने तरी असे निराश करायला नको होते. बॉर्डर चित्रपटाने जे कौतुक वाट्याला आले ते त्यानी दुर्दैवाने गमावले. बॉर्डर सर्वच बाबतीत जमून आलेला युद्धपट.
हकिकत, ’बॉर्डर’ हे हिंदी चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीतील प्रभावी युद्धपट आहेत. चित्रपट रसिकांनी त्यांना मनापासून भरभरुन प्रतिसाद दिला. उरी यापेक्षा वेगळा. तोही आवर्जून पाहण्यासारखा चित्रपट. सध्याच्या सामाजिक वातावरणात या चित्रपटांची चर्चा होणे, ओटीटीवर ते पाहिले जाणे स्वाभाविक आहेच.
-दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply