
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा लोकसेवेचा वसा समर्थपणे चालवित समाजाला आवश्यक सेवा देण्याचे काम सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष तरुण तडफदार, अभ्यासू, लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून सातत्याने होत आहे. सामान्य कार्यकर्ता ते भाजप जिल्हाध्यक्ष, आमदार, सिडको अध्यक्ष यासह अनेक सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील पदे ते भूषवित असले तरी ‘कितीही मोठा झालो, तरी मी सामान्य कार्यकर्ता आहे’ हीच समाजहिताची भूमिका त्यांनी जोपासली. त्यामुळे खर्या अर्थाने कर्तृत्वाने ते मोठे झाले. त्यामुळे ‘मूर्ती लहान, पण कीर्ती महान’ अशी टॅगलाईन त्यांच्या नावाला लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या ‘गुडबुक’ मधील यादीत समावेश करून पनवेलसह कोकणाचा सन्मान केला आहे.
अवघ्या कोकणचे समर्थ नेतृत्व असलेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेलला विकासाचे मॉडेल बनविण्याचे त्यांचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. हेच त्यांच्या लोकप्रियतेचे प्रमुख कारण आहे. विरोधाचे राजकारण न करता सत्तेत राहून विकास साधण्याच्या त्यांच्या दूरदृष्टीला सलाम करावा लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासयात्रेतील या सच्च्या कार्यकर्त्याच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा आहे. बदलत्या आणि बहरत्या पनवेल महानगराच्या स्वप्नपूर्तीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सहकार्यांनाही अग्नीदिव्यातून जावे लागले आहे. निःस्वार्थ सेवेसाठी पदत्यागसुद्धा करावा लागला. पनवेलकरांच्या या नेत्याची ‘टोलमुक्तीचे शिल्पकार’ म्हणून इतिहासाने नोंद घेतली आहे. या लढ्यात त्यांची भूमिका आणि तळमळ अनेकांनी पाहिली आहे. शांत स्वभावाच्या माणसाला आलेला राग त्याला आवरताना किती मानसिक त्रास होत असेल या कल्पनेने हादरून जायला होते. इतका मानसिक हलकल्लोळ होत असतानाही संयमाने सतत पाठपुरावा करून न्याय मिळवून घेणे ही शिकवण आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवोदित राजकीय कार्यकर्त्यांसमोर ठेवली आहे. राजकीय कार्यकर्त्याच्या डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायाला भिंगरी हवी असे अपेक्षित असते. याचे मूर्तिमंत उदाहरण आमदार प्रशांत ठाकूर हे आहेत. त्यांचा राजकीय प्रवास प्रेरणादायी आहे. सत्तेत असो व नसो जनतेसाठी सतत काम करायचेच आणि हाच त्यांचा पिंड त्यांना विधायक कार्य करण्याची ऊर्जा देतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, युवकांच्या हातात देश द्यायचा आहे. त्यासाठी सक्षम युवा नेतृत्व कसे असावे याचे उदाहरण द्यायचे असेल, तर ते आमदार प्रशांत ठाकूर आहेत. आरोग्य शिबिर, रोजगार मेळावे अशा उपक्रमातून लोकसंग्रह करीत सामान्य कार्यकर्ता ते नगराध्यक्ष पुढे आमदार असा प्रवास करणारे कोकणातील युवकांचे आदर्श असणारे म्हणून त्यांची ख्याती असून, कोकणातील भाजपचे एकमेव आमदार असले, तरी संपूर्ण जिल्ह्याला सांभाळण्याचे काम ते त्यांच्या कर्तृत्वशैलीने पार पाडतात. पनवेलला अशा अनेक ज्येष्ठ नेत्यांचा आशीर्वाद आणि शिकवण लाभल्यामुळे ते नेहमी जोशामध्ये घाईघाईने कोणताही निर्णय न घेता जे काम करायचे ते उत्कृष्ट करायचे असा त्यांचा ध्यास सदैव दिसतो. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळामार्फत राबविले जाणारे अनेक उपक्रम आणि त्यांचे नियोजन पाहिले असता, त्या उपक्रमामागील असणारी त्यांची तळमळ दिसून येते. सकाळी लवकर उठून घरी आलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या निकाली काढणे त्यानंतर दिवसभर पायाला भिंगरी लावून सतत वेगवेगळे विषय हाताळणे हे त्यांच्या अंगवळणीच पडले आहे, असे म्हणावे लागेल. रायगड किल्ला चढून जाणारे आणि मंत्रालयातील लिफ्ट न वापरता चढून जाणारे आमदार प्रशांत ठाकूर हे एकमेव आमदार असतील. सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, आरोग्य, राजकीय, अशा क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर यांचे कार्य नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. आजपर्यंत त्यांनी केलेली कार्य समाजात आदर्श निर्माण करणारी आहेत. लोकांना सदृढतेचा मार्ग दाखवण्यासाठी नेहमी ते प्रयत्नशील असतात, त्यामुळे या तरुण नेतृत्वाकडून अभ्यासू असण्याची सर्वांनाच अपेक्षा असते. या अपेक्षेला आमदार प्रशांत ठाकूर पुरून उरतात. त्यांच्या सभागृहातील आणि सभागृहाबाहेरील भाषणांतून याची प्रचिती येते. विषयाच्या मुळाशी जाण्याची त्यांची वृत्ती सर्वांना मोहात टाकणारी ठरते.
उड्डाणपूल, 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर, नाट्यगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, प्रशासकीय भवन, रस्ते, पायाभूत सुविधा देण्याबरोबरच आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक सेवा करण्याचे अबाधित काम त्यांच्याकडून होत आहे. राजकीय नेते शक्यतो कला, साहित्य, क्रीडा या प्रांतापासून चार हात लांब असतात, मात्र आमदार प्रशांत ठाकूर याला अपवाद आहेत. राजकीय स्वार्थासाठी विविध स्पर्धा न भरवता प्रत्यक्ष बारीकसारीक गोष्टीत लक्ष घालून उत्कृष्ट व्यासपीठ निर्माण करीत ते पनवेल आणि रायगडमधील कलावंत आणि खेळाडू, तसेच साहित्यिकांना प्रोत्साहन देत असतात. स्वतः नवनवीन पुस्तकांचे वाचन करताना ते नेहमी आढळतात. कलेला राजाश्रय मिळाल्यामुळेच रायगडमधील कलावंत उच्च यश संपादन करताना दिसत आहेत. दरवर्षी ते भरवत असलेला मल्हार महोत्सव ही पनवेलकरांसाठी पर्वणीच असते. आपल्या धावपळीच्या जीवनात असे कार्यक्रम त्यांना आत्मिक आनंद देत असल्याची कबुली ते नेहमीच देतात. पनवेलला विकासात बदलण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही, कारण आमदार प्रशांत ठाकूर म्हटले की समाजाचा विकास ही व्याख्या नजरेसमोर येते. ते नेहमी सर्वांना निरोगी राहण्याचा सल्ला देतात, त्यामुळेच ते दरवर्षी आरोग्य महाशिबिर आयोजित करून रुग्णांची सेवा करतात. ते एवढ्यावर थांबत नाहीत, तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनही ते रुग्णांना आर्थिक मदत करत असतात. जानेवारी 2015 ते जून 2019 पर्यंत शेकडो रुग्णांना जवळपास एक कोटीहून अधिक रुपयांची मदत त्यांनी केली असून ते आरोग्यदूताची भूमिका योग्यरीत्या पार पाडत आहेत. त्यांच्याकडून समाजाची अखंडपणे सेवा होत आहे, त्यामुळे समाजप्रिय असलेले नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर खर्या अर्थाने आदर्श व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे त्यांना समाजप्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जाते.
रायगडच्या राजकारणात युवा पिढीचे शिलेदार म्हणून पनवेलचे कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे मोठ्या अभिमानाने आणि आशेने पाहिले जाते. कारण रायगडच्या राजकारणात आता जी नेतेमंडळी कार्यरत आहेत. त्यात आमदार प्रशांत ठाकूर हे सर्वात तरुण आणि क्रियाशील लोकप्रतिनिधी म्हणून सुपरिचित आहेत. त्यांचा एकूणच राजकीय प्रवास अवघ्या दशकभराचा असला, तरी 10 वर्षात त्यांनी केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे हे कुणीही नाकारू शकत नाही. पनवेलचे नगराध्यक्ष ते पनवेलचे दोन वेळा आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास सुरू आहे. या ठिकाणी काम करताना आपण एक जागरूक लोकप्रतिनिधी असल्याचे त्यांनी कृतीतून दाखवून दिलेले आहे.पक्षनेतृत्वाने दिलेली जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडण्याचे काम प्रशांत ठाकूर नेहमीच करीत आलेले आहेत. प्रामाणिकपणा हा आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष गुण होय. या प्रामाणिकपणाचे फळ त्यांना नेहमीच मिळत आलेले आहे. पनवेलचे नगराध्यक्ष असताना त्यांनी शहराच्या विकासासाठी केलेली कामे नजरेआड कदापि करता येणार नाहीत. आमदार म्हणून त्यांनी पनवेलच्या विकासासाठी भरीव कामे केली आहेत. दुसर्यांदा आमदार म्हणून काम करताना त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासाकडे विशेष लक्ष दिल्याचे दिसून येते. पनवेल महापालिकेची स्थापना करण्याबरोबरच त्या महापालिकेत भाजपची निर्विवाद सत्ता आणण्यातही आमदार प्रशांत ठाकूर यांचा सिंहाचा वाटा आहे. महापालिकेची निर्मिती झाल्याने या महानगरीच्या विकासाच्या वाटा आणखी रुंदावत चालल्या आहेत हे नक्की. आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, सी लिंक, मुंबई-गोवा हायवे आदी प्रकल्पांमुळे पनवेलचा चेहरामोहरा बदलत चाललाय, नागरीकरणही झपाट्याने वाढू लागलेले आहे. त्यामुळे पनवेलचा दर्जा वाढतोय. अशा वेळी येथे वास्तव्य करून राहणार्यांना दर्जेदार नागरी सुविधा पुरविण्यासाठी राज्य सरकार महापालिका, सिडकोच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. याची पूर्तता करण्याची जबाबदारी आता सरकारने आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावरच सिडकोचे अध्यक्षपद देऊन टाकली आहे. ती पूर्ण करण्यासाठी तेसुद्धा प्रामाणिकपणे काम करताना दिसत आहेत.
सिडकोचा पदभार स्वीकारल्यापासून सिडको हद्दीतील परिसरात विविध सुविधा देण्यावर विशेष लक्ष त्यांनी केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने जवळपास 100 कोटी रुपयांची विकासकामे पनवेल महापालिका हद्दीत होणार आहेत, त्याचाच हा एक परिपाक आहे. त्याचबरोबर सिडको प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यात आमदार प्रशांत ठाकूर यांना अपेक्षित असे यश आले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यपद्धतीचा पगडा रायगडातील युवा पिढीवर चांगल्या प्रकारे पडल्याचे प्रकर्षाने दिसून येते. त्यामुळेच आज रायगडात भाजप प्रस्थापित होऊ लागल्याचे जाणवू लागले आहे आणि यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, लोकनेते रामशेठ ठाकूर यांचेही सहकार्य त्यांच्या पाठीशी असून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रायगडात भाजपची गेल्या पाच वर्षात निश्चितच कौतुकास्पद कामगिरी झालेली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांसह विविध ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळू लागलेले आहे. आधी केवळ नावापुरत्याच अस्तित्वात असलेल्या भाजपची दखल आता रायगडातील प्रस्थापितांना घेणे भाग पडू लागले आहे. केंद्रात पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता आली आहे. त्याचीच पुनरावृत्ती राज्यातील विधानसभा निवडणुकीतही होणार आहे. त्या निवडणुकीत आणखी भरीव कामगिरी करून दाखविण्याची संधी रायगडात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील भाजपला मिळणार आहे. त्या संधीचे ते निश्चितच सोने करतील आणि प्रस्तापितांच्या रायगडात भाजपचे कमळ डौलाने उमलेल, यात शंका नाही. राजकारणाबरोबरच सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रातही आमदार प्रशांत ठाकूर यांचे भरीव योगदान आहे. अर्थात यामागे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा भक्कम पाठिंबा आहे हे सर्वश्रृत आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा वसाच त्यांनी घालून दिलेला आहे. त्याच मार्गावरून आमदार प्रशांत ठाकूर वाटचाल करीत आहेत. त्यामुळे रायगडातील युवा पिढीचे शिलेदार असाच त्यांचा आवर्जून उल्लेख करणे उचित ठरेल.
…आणि तो क्षण पनवेल,
रायगडकरांसाठी अभिमानाचा ठरला
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा भूमिपूजन सोहळा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतर मान्यवर व्यासपीठावरून मार्गस्थ होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व आमदार प्रशांत ठाकूर यांच्यात हँडशेक झाले. या वेळी मोदीजींनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत खांद्यावर हात टाकत व्यासपीठावरून खाली उतरले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट व त्यांच्यात झालेली चर्चा पनवेल व रायगडच्या दृष्टीने महत्त्वाची आणि अभिमानाची ठरली. विधायक कामातून सर्व समाजाची अहोरात्र सेवा करणार्या या समाजप्रिय नेतृत्वाला वाढदिवसाच्या कोटी-कोटी शुभेच्छा!
-हरेश साठे, प्रसिद्धीप्रमुख
RamPrahar – The Panvel Daily Paper