आमदार महेश बालदींचा अमेटी युनिव्हर्सिटीला इशारा
पनवेल : रामप्रहर वृत्त
अमेटी युनिव्हर्सिटीमध्ये काम करणार्या प्रकल्पग्रस्त कामगारांना योग्य वेतन द्यावे; अन्यथा अमेटी युनिव्हर्सिटीविरोधात आंदोलन करण्याचा पवित्रा आमदार महेश बालदी यांनी घेतला आहे.
या संदर्भात आमदार महेश बालदी यांनी अमेटी युनिव्हर्सिटीच्या व्यवस्थापनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल तालुक्यातील भाताण येथील अमेटी युनिव्हर्सिटीमध्ये साधारणत: 100 प्रकल्पग्रस्त कामगार विविध विभागांमध्ये कार्यरत आहेत आणि या आस्थापनेमध्ये काम करणार्या कामगारांना किमान वेतनापेक्षा कमी पगार दिला जात आहे, असे माझ्या निदर्शनास आले असून मध्यंतरीच्या काळात सर्व स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगारांनी रायगड जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त (पनवेल) यांच्याकडे या संदर्भात दावा दाखल केला होता, मात्र अमेटी युनिव्हर्सिटीच्या संबंधित व्यवस्थापन उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळकाढूपणाची भूमिका घेत आहे. ही भूमिका कामगारांवर अन्याय करणारी आहे.
कामगारांवर अन्याय दूर करण्यासाठी संबंधित पत्राची दखल घेऊन कामगारांच्या वेतनासंबंधी बैठकीचे आयोजन करून स्थानिक कामगारांना न्याय द्यावा; अन्यथा अमेटी युनिव्हर्सिटी व्यवस्थापनाविरुद्ध आंदोलन छेडले जाईल आणि त्यामुळे होणार्या परिणामास अमेटी युनिव्हर्सिटी व्यवस्थापक पूर्णपणे जबाबदार राहतील, असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper