सातारा : रामप्रहर वृत्त
शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास हे रयत शिक्षण संस्थेचे उद्दिष्ट आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शंभर वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या या संस्थेचे उद्दिष्ट शंभर वर्षानंतरही तसूभर बदललेले नाही. रयत शिक्षण संस्था ही अशा प्रकारची महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे, जिचा स्थापनेपासून आजही शिक्षण हाच ’रयत’चा धर्म राहिला आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध ग्रामीण कवी इंद्रजीत भालेराव यांनी केले. संस्थेच्या 106व्या वर्धापन दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास व्हाईस चेअरमन अॅड.भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, कर्मवीर कुटुंबीय, संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार रामशेठ ठाकूर, जे.के.जाधव, प्रभाकर देशमुख, सदाशिव कदम, भैय्यासाहेब जाधव, अरुण पवार, प्रशांत पाटील, यशवंत पाटणे, जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
रयत शिक्षण संस्था ही गुणवत्तेला प्राधान्य देणारी संस्था आहे. आज संस्थेत जागतिक पातळीवरील उपक्रम सुरू आहेत, असे सांगून या वेळी कवी इंद्रजीत भालेराव यांनी विविध गाजलेल्या कविता सादर केल्या.
चेअरमन चंद्रकांत दळवी संस्थेच्या प्रगतीबाबत बोलताना म्हणाले की, उत्साहाने काम करणारे शिक्षक हीच संस्थेची ताकद आहे. संस्थेच्या सर्व शाखेत इंटरअॅक्टीव्ह पॅनल, कृत्रिम बुद्धीमत्ता प्रशिक्षण, ईआरपी स्वॉफ्टवेअर, संस्थचे स्वतःचे डेटा सायन्स सेंटर आहे. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारी रयत अकॅडमी सुरू करीत असल्याचेही त्यांनी या वेळी जाहीर केले.
संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत भरीव योगदान देणार्या व्यक्तींच्या स्मरणार्थ उपक्रमशील शाखा, उपक्रमशील शिक्षक, लाईफ वर्कर, लाईफ मेंबर, प्राचार्य, आदर्श विद्यार्थी, विद्यार्थिनी, विज्ञान शिक्षक, कार्यक्षम गुरुकुल प्रमुख इत्यादी पुरस्कार देण्यात आले. क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षिकेचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, माध्यमिक विभागाचे सहसचिव बी.एन.पवार, ऑडीट विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, अॅड. दिलावर मुल्ला यांच्यासह जनरल बॉडी सदस्य, आजीव सभासद, आजीव सेवक, विविध शाखांचे शाखाप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सविता मेनकुदळे यांनी केले, तर आभार डॉ. मेनकुदळे यांनी मानले.
Check Also
ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …
RamPrahar – The Panvel Daily Paper