सूर्यनमस्कारात नवा विक्रम
मोहोपाडा : प्रतिनिधी
रसायनी विभागातील कन्या व सध्या पुण्यात वास्तव्यास असलेल्या मनीषा गजानन पवार यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यांनी 1 मिनिट 24 सेकंदांत 18 सूर्यनमस्कार करून नवा विक्रम रचला आहे. याआधीचा विक्रम एवढ्याच वेळेत 16 सूर्यनमस्कारांचा होता.
मनीषा पवार या योग प्रशिक्षक असून त्यांनी आजवर अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबाला दिले असून पतीने दिलेल्या सहकार्यामुळेच हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. पुढे त्या म्हणाल्या की, माझे वडील केंद्रप्रमुख दिवंगत पोपट सोनवणे यांच्यात खेळाडूवृत्ती असल्याने त्यांच्याकडून हे मला बाळकडू मिळाले. मनीषा यांच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper