रसायनी : प्रतिनिधी : दांड-रसायनी रस्त्यावर झाडांच्या फांद्या वाढलेल्या असून त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. यामुळे वाहनचालक हैराण झालेले असून झाडांच्या वाढलेल्या फांद्यांमुळे अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.
रसायनी पाताळगंगा हा औद्योगिक परिसराने वेढलेला भाग असल्याने या परिसरात येण्याजाण्याकरिता दांड-रसायनी रस्त्याचाच वापर केला जातो. या रस्त्यावरून अवजड वाहनांची नेहमी रेलचेल असते. सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूला जुनाट झाडांच्या फांद्या वाढल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
शिवाय रस्त्याच्या मधोमध या फांद्या झुकल्या आहेत. या वेळी अवजड वाहन जात असताना जुनाट लोंबणार्या फांद्यांना लागून अपघाताची अधिक शक्यता आहे. शिवाय पावसाळ्यात या फांद्या उन्मळून रस्त्यावर पडत असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. तरी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून या रस्त्यावरील अडथळा ठरत असलेल्या झाडांच्या फांद्या हटविण्यात येऊन अडसर दूर करावा, अशी मागणी वाहनचालक व प्रवासी वर्गातून होत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper