Breaking News

राज्यात काँग्रेसची वाट बिकट; जागावाटपाचा तिढा सोडवण्यात राज्य नेतृत्व अपयशी

मुंबई ः प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष प्रचाराला लागले आहेत. महाराष्ट्रातही शिवसेना-भाजपाने युती जाहीर करून दोन्ही पक्षांच्या संयुक्त कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार सुरू ठेवलंय, मात्र या सगळ्या राजकीय घडामोडीत विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अद्यापही औपचारिकरित्या आघाडीची घोषणा केली नाही. काही जागांवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात एकमत नसल्याने आघाडीचा प्रचार थंड पडल्याचे दिसून येते.

1 मार्च रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून धुळे आणि मुंबई येथे कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता, मात्र अजूनही पक्ष नेतृत्वाला काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला चाप लावण्यात म्हणावे तितके यश आले नाही. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून काँग्रेस 25 जागांवर, तर राष्ट्रवादी 23 जागांवर निवडणुका लढणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातील एक जागा खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला सोडण्याचा निर्णय घेतला आहे, तर आणखी एक जागा काँग्रेसने सोडावी, अशी मागणी राजू शेट्टी यांच्याकडून करण्यात आली आहे. वर्धा किंवा सांगली या दोन्हींपैकी एक लोकसभा मतदारसंघ काँग्रेस राजू शेट्टी यांच्यासाठी सोडू शकतो, मात्र त्यावर स्पष्ट निर्णय काँग्रेस नेतृत्वाकडून अद्याप घेण्यात आला नाही. देशात राहुल गांधी, प्रियंका गांधी आक्रमकरित्या भारतीय जनता पार्टीविरोधात निवडणुकीच्या रणांगणात उतरले असताना दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संघटनात्मक धोरण, अंतर्गत गटबाजी आणि युवा तसेच नवीन मतदारांशी संपर्काचा अभाव, त्याचसोबत पक्षनेतृत्व आणि ग्रामीण स्तरावरील कार्यकर्त्यांमध्ये असलेली दुरी याचा फटका महाराष्ट्र काँग्रेसला आगामी निवडणुकीमध्ये सहन करावा

लागू शकतो. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आपापल्या लोकसभा मतदारसंघाबाबत चिंतेत आहेत. त्यामुळे राज्यामध्ये इतर ठिकाणी लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही. काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या उस्मानाबाद आणि रावेर मतदारसंघावर दावा केला आहे. उस्मानाबाद येथून काँग्रेसतर्फे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर हे इच्छुक असल्याचं कळतंय, तर काँग्रेसकडे असणार्‍या औरंगाबाद आणि अमरावती येथील जागांवर राष्ट्रवादीने दावा केला आहे.  काँगेसमधील एका ज्येष्ठ आमदाराने सांगितले, जागावाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मागील तीन महिन्यांपासून बैठका सुरू आहेत, मात्र पक्षनेतृत्वाकडून कोणताही ठोस निर्णय अजून झाला नाही. जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी पुढील दोन-तीन दिवसांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादीचेसर्वेसर्वा शरद पवार यांच्यात बैठक होईल. त्यानंतर यावर तोडगा निघेल, असे सूत्रांनी सांगितले आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply