मुंबई, पंढरपूर : प्रतिनिधी
गेल्या चार दिवसांपासून राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, या वेळी ग्रामीण भागासह शहरांनाही याचा मोठा फटका बसला आहे. अगदी तळकोकणापासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, पंढरपूर शहरात चंद्रभागा तीरावर असलेल्या कुंभार घाटाची भिंत बुधवारी (दि. 15) दुपारी दीडच्या सुमारास कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. राज्यातील अनेक शहरांमध्ये सखल भागात पाणी साचले असून, काही ठिकाणी घरातही शिरले आहे, तर शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसाने ऊस, मका, तुर, ज्वारी या पिकासह डाळिंब, द्राक्ष बागाचे नुकसान झाले आहे. शेतात उभ्या असलेल्या पिकातच फूट दोन फूट पाणी साचले आहे. हे पाणी बाहेर काढण्यासाठी शेतकरी प्रयत्न करताना दिसत आहेत. तीन दिवस सुरू असलेल्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. पंढरपूरच्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये गोपळ अभंगराव, राधा अभंगराव, मंगेश अभंगराव, पिलू जगताप, इतर अनोळखी व्यक्तींचा समावेश असून, यात यवतमाळ भागातील दोन वारकरी महिलांचे मृतदेह असल्याचे सांगितले जात आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper