माणगाव : रामप्रहर वृत्त
जगदगुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठाच्या माणगाव तालुका सेवा समितीने शनिवारी (दि. 11) येथील श्री गोरक्षनाथ मंदिरात महिला मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला 145 महिला व 65 गुरुबंधू उपस्थित होते. जगद्गुरु श्री माऊलींच्या नामगजराने या मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला.
मेळाव्यानिमित्त विंचवली ते श्री गोरक्षनाथ मंदिरापर्यंत पालखी दिंडी काढण्यात आली होती. महिला पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झाल्या होत्या. पालखीचे मेळाव्याच्या ठिकाणी आगमन झाल्यानंतर पाद्यपूजा करण्यात आली. यावेळी वसई पिठावर सेवेसाठी गेलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यानंतर गणी गण गणात बोते या महामंत्राचा जप करण्यात आला.
दुपारच्या सत्रात प्रवचनकार सुकन्या पालेकर (पुणे) आणि परभणी पिठ प्रमुख गणेश मोरे यांनी मार्गदर्शन केले. सायंकाळी मेळाव्याची सांगता करण्यात आली.
मेळाव्याचे सूत्रसंचालन अरुणा पाटील यांनी केले. हा महिला मेळावा यशस्वी होण्यासाठी जिल्हा निरीक्षक सुनल वीर, सेवाध्यक्ष सुधीर पुळेकर, महिला प्रमुख अंजली जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव तालुका सेवाध्यक्ष गुरुनाथ कामत, महिला प्रमुख योगिता धाडवे, संतोष पोतदार, जितेंद्र दोशी यांनी विशेष परिश्रम घेतले. माणगाव, श्रीवर्धन, तळा, पोलादपूर, म्हसळा व मुरूड तालुक्यातील शिष्य, साधक, भक्त, हितचिंतक महिला उपस्थित होत्या.
RamPrahar – The Panvel Daily Paper