ना वेळेवर पगार, ना वैद्यकीय बिलांचा परतावा
पेण : प्रतिनिधी
कोरोना काळात एसटीची आर्थिक संकटात रुतलेली चाके आता काही प्रमाणात बाहेर येऊन पूर्वपदावर येत असताना कर्मचार्यांपुढे मात्र पगार तसेच वैद्यकीय बिलांच्या अभावी जगायचे कसा प्रश्न निर्माण झाला आहे. वेतनाअभावी एसटी कर्मचार्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
कोरोना काळातील निर्बंधाचा फटका उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणात बसला, त्याचप्रमाणे एसटी महामंडळालादेखील मोठा आर्थिक फटका बसला आहे. प्रवासी व माल वाहतूक हेच उत्पन्नाचे प्रमुख मार्ग बंद असल्याने एसटीचा गाडा आणखी खोलात गेला. त्यातच राज्य शासनाकडून निधी उपलब्धतेत विलंब याचा परिणाम कर्मचार्यांच्या पगारावरदेखील झाला आहे. वैद्यकीय बीलेदेखील रखडली असल्याने कर्मचार्यांचा मनस्तापात आणखी भर पडली आहे.
कोरोनाकाळात एसटी कर्मचार्यांचा वेतनाचा प्रश्न गंभीर झाला होता. आता एसटीची गाडी पुन्हा रस्त्यावर धावू लागली असली तरी वेळेवर पगार होत नसल्याने कर्मचार्यांचे हाल होत आहेत. रायगड विभागातील महाड, श्रीवर्धन, पेण, माणगाव, अलिबाग, मुरुड, कर्जत, रोहा या आठ आगारात दोन हजार 271 कर्मचारी काम करीत आहेत. यामध्ये 503 वाहक, 493 चालक असून, वर्ग दोनचे 19 अधिकारी व 806 प्रशासकीय व कार्यशाळा कर्मचारी यांचा समावेश आहे.
कोरोना काळातील निर्बंधामुळे एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. त्या काळात कर्मचार्यांना पगार बंदच होता. निर्बंध शिथिल झाल्यानंतर प्रवासी व मालवाहतूक सेवा सुरु झाली. मात्र प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्याचा परिणाम कामगारांच्या पगारावर झाला आहे. दरम्यान, कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची वैद्यकीय सुविधेची बिलेदेखील वेळेत मिळत नसल्याने कामगार मेटाकुटीला आले आहेत. कोरोना काळात पगार बंद, आता पगार वेळेवर नाही, त्यात स्वतःच्या व कुटुंबातील सदस्यांच्या आजारपणाकडेदेखील दुर्लक्ष होत आहे.
महामंडळाकडील निधीच्या उपलब्धतेप्रमाणे कर्मचार्यांचे पगार व वैद्यकीय बिले दिली जात आहेत.
-अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, एसटी रायगड
RamPrahar – The Panvel Daily Paper