
कोरोनाने रायगड जिल्ह्याला आपल्या कवेत घेतले आहे. पूर्वी केवळ शहरांपुरता मर्यादित असलेल्या कोविड-19च्या विषाणूने एव्हाना जिल्ह्याचा ग्रामीण भागही व्यापला असून, सुधागड हा एकमेव तालुका सोडला तर उर्वरित सर्व 14 तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. दुर्दैवाने काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर दुसरीकडे काही जण उपचार घेऊन बरे होत सुखरूप घरीही परतत आहेत.
कोरोना रुग्णांची जिल्ह्यात दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. याआधी पनवेल तालुका त्यातही महापालिकेचा शहरी भाग कोरोनाचा हॉटस्पॉट होता. हळुहळू तालुक्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाने हातपाय पसरले. तरीही शहरी वस्तीत रुग्ण आढळण्याचे प्रमाण अधिक आहे. यातील बहुसंख्य रुग्णांचे मुंबई कनेक्शन दिसून आले आहे. दैनंदिन अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईला जाणार्यांमुळे पनवेल परिसरासह तालुक्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा आरोग्यकर्मी, पोलीस, डॉक्टर यांसारख्या सेवाकर्मींना कोरोनाची लागण होत असून, त्यांच्यापासून त्यांच्या कुटुंबीयांना संसर्ग होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. या मंडळींची राहण्याची व्यवस्था मुंबईत कामाच्या ठिकाणी व्हावी, अशी मागणी जोर धरूनही राज्य शासनाने त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याने कोविड योद्धे व त्यांच्या कुटुंबीयांचाही जीव धोक्यात आहे. दुसरीकडे मुंबईहून आपल्या मूळ गावी चाकरमानी परतले आहेत. लॉकडाऊनमुळे सध्या काम-धंदा नसल्याने त्यांना गावी परतण्यावाचून पर्याय नव्हता, पण यातील अनेक जण कोरोना सोबत घेऊन आले असल्याने ग्रामीण भागात घबराट पसरली आहे. सुदैवाने काही ठिकाणचे ग्रामस्थ मुंबईतून परतलेले लोक आपलेच बंधू-भगिनी आहेत, हे समजून त्यांची चांगल्या प्रकारे व्यवस्था करताना पहावयास मिळत आहे, परंतु या सर्वांनी कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्याची गरजेचे आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील सुधागड हा एकमेव तालुका वगळता अन्य सर्व 14 तालुक्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी एकाच दिवसात 54 नवे रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा सातशेपार झाला आहे, तर मृतांची संख्या 33 झाली आहे. रुग्णसंख्या व मृतांचा आकडा वाढत असताना दुसरीकडे रुग्ण बरे होत असल्याने दिलासाही मिळत आहे. कोविड-19 नेबाधित झालेले व उपचारानंतर बर्या झालेल्या नागरिकांची संख्या जिल्ह्यात एकूण 373 आहे. यामध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 196, पनवेल ग्रामीण 74, उरण 87, खालापूर 2, कर्जत 3, पेण 1, अलिबाग 3, तळा 1, श्रीवर्धन 5, पोलादपूर 1 अशी आकडेवारी आहे. जिल्ह्यात आता कोरोनाचे संक्रमण वेग धरू लागले आहे. नवनवीन ठिकाणाहून रुग्ण समोर येत असल्याने प्रशासनाचीही तारांबळ उडत आहे. या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेणे हा तूर्त एकच उपाय आहे. मास्क बांधणे, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंग राखणे या त्रिसुत्रीबरोबरच अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडणे हे कटाक्षाने पाळणे जरुरीचे आहे, मात्र अनेक लोक विनाकारण फिरत आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यापासून तर जणू काहीच झालेले नाही अशा अविर्भावात लोक बाजारपेठांमध्ये गर्दी करू लागले आहेत. कोरोनाशी दोन हात करून लढायचेय म्हणजे काही जीव धोक्यात टाकणे नव्हे. कोविड-19चा विषाणू साध्या डोळ्यांनाही दिसत नाही. शिवाय त्याला भेदाभेद असायला तो माणूस नाही. तो कुणाच्याही शरिरात शिरू शकतो. त्यामुळे सावधान! सर्वांनी स्वत:सह आपल्या परिवाराची काळजी घ्या.
RamPrahar – The Panvel Daily Paper