कर्जत तालुक्यात 2609 गौरींचे पूजन
कर्जत : प्रतिनिधी
गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दोन-तीन दिवसांनी गौरीचे आगमन होते. काही ठिकाणी फुलांच्या तर काही ठिकाणी मूर्तीच्या गौरींचे पूजन करण्यात येते. त्यानंतर घरातील व शेजारील सुवासिनी गौरीचा ओवसा घेतात. यंदा कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1346, नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1252, माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीत 11 अशा 2609 गौरींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गौरींचे आगमन एकाच वेळी होते. कुणी मूर्तीची गौर पूजतात तर कुणी आदल्या दिवशी पहाटेच रानात जाऊन कचोर्याची फुले (गौरीची फुले) व तेरड्याच्या फुलांसकट फांद्या आणतात. त्यानंतर महिला रात्रभर गाणी गात गौर सजवण्यात गुंततात. साडी नेसवून गौर सजवून त्यावर मुखवटा आणि पुठ्ठ्याचे हात लावून खुर्चीवर गौर बसवितात. कुणाच्या उभ्या गौरी तर कुणाच्या नाचर्या गौरी असतात. त्यांचे पूजन मात्र सारख्याच पद्धतीचे असते. गौरी पूजन रविवारी दुपारी झाल्यावर घरातील सुवासिनींनी नटून थाटून सुपामध्ये पुजेचे साहित्य घेऊन गौरीचा ओवसा घेतला. विशेष म्हणजे नववधूने हा ओवसा घेतलाच पाहिजे असे परंपरेनुसार ठरलेले आहे. या वेळी त्यांनी उकडलेल्या पिठांचे दिवे लाऊन गौरींना ओवाळले. या सोहळ्याचा आनंद बहुतांश घरातील सुवासिनींनी घेतला. बर्याच ठिकाणी केवळ गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. गौर आणली जात नाही. काहींची गौर एकच असते, अशा ठिकाणी सारे कुटुंबीय गौराई असलेल्या मोठ्या घरी एकत्रित झाले आणि गौरी पुजानाचा आनंद लुटला.
मुरूड : तालुक्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गणपती विराजमान झाल्यानंतर तिसर्या दिवशी गौरीचे आगमन झाले. गौरीपूजन झाल्यानंतर रविवारी (दि. 4) दुपारी सुवासिनींनी पारंपरिक ओवसा घेतला. गौरीपूजन हा प्रामुख्याने स्त्रियांचा सण आहे. सुवासिनी व कुमारिका पारंपारिक व रितीरिवाजाप्रमाणे गौरीचे पूजन करतात. आंबा, केळी, पान व विडा, हिरव्या बांगड्या, नारळ आदी पुजेच्या वस्तू बांबूच्या सुपात घेऊन मुरूड तालुक्यातील सुवासिनींनी ओवसा घेतला. गौरीपूजनासाठी रविवारी ठिकठिकाणी गर्दी दिसून आली. नवीन साड्या परिधान करून महिला गौरी पूजनासाठी जात होत्या. श्रद्धेने पूजन करून आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी पार्थना करीत होत्या.
पेण खारेपाट भागात गौराई नाचविण्याची प्रथा
पेण : तालुक्याच्या खारेपाट विभागातील भाल, विठ्ठलवाडी, जनवलीबेडी, मोठे भाल, तुकाराम वाडी, वाशी, वढाव, खारसापोली, फणसडोंगरी या गावांमध्ये गौरी नाचविण्याची परंपरा कायम आहे. या परंपरेनुसार गणेशोत्सवात घरोघरी ज्येष्ठ गौरी आगमन होेते. गौराईला पाटावर ठेवून हा पाट डोक्यावर घेवून अनवाणी पायांनी कोणत्याही प्रकारचा आधार न घेता केवळ शारीरिक समतोल राखून खारेपाट भागात गौराईचे आगमन व विसर्जन करण्यात येते. चैत्र महिन्यातील चैत्रगौर, श्रावण महिन्यातील मंगळागौर, भाद्रपदातील हरतालिका व गणेश उत्सवादरम्यान ज्येष्ठ गौरी या वर्षातील चार गौराई नाचविण्यात येते. घरी प्रतिष्ठापना केल्यानंतर गौराईचे विधीवत पूजन करून तिला नैवेद्य दाखविण्यात येतो.
RamPrahar – The Panvel Daily Paper