अलिबाग : प्रकाश सोनवडेकर
रायगड जिल्ह्यात पावसाने 20 वर्षांमध्ये प्रथमच चार हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला आहे. गुरुवारपर्यंत (दि. 5) चार हजार 135 मिलीमीटर पाऊस पडला. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान तीन हजार 142 मिमी आहे. वार्षिक पर्जन्यमानाच्या 131 टक्के पाऊस आजपर्यंत पडला. यंदा सरासरीच्या 150 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
रायगड जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरी तीन हजार 142 मिमी पाऊस पडतो. त्यापेक्षा जास्त पाऊस अनेकदा पडला आहे, परंतु चार हजार मिमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची मागील 20 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी जिल्ह्यात 2016मध्ये तीन हजार 930 मिमी, तर 2015मध्ये तीन हजार 853 मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा जून महिन्यातच सरासरीच्या 91 टक्के, जुलै महिन्यात सरासरीच्या 161 टक्के, ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या 132 टक्के, तर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांत 105 टक्के पावसाची नोंद झाली आहे. अजूनही पावसाळ्याचा एक महिना शिल्लक आहे.
24 तासांमध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याचा विक्रम पोलादपूरच्या नावावर आहे. 26 जुलै 2005 रोजी पोलादपूरमध्ये 24 तासांत 589 मिमी पाऊस नोंदविला गेला होता. यंदा 24 तासांत सर्वाधिक पाऊस 27 जुलैला माथेरानमध्ये 434 मिमी पडला. त्याच दिवशी पेणमध्ये 400 मिमी पावसाची नोंद झाली.
दरम्यान, या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, परंतु शेतीचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. आतापर्यंत 18 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले आहे. सहा कोटी रुपयांहून अधिक सार्वजनिक व खासगी मालमत्तांचे नुकसान झाले आहे, तर तीन महिन्यांत सुमारे 25हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सरारीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. माथेरानमध्ये 198 टक्के, पेणमध्ये 168 टक्के, तळा येथे 160 टक्के, तर माणगावमध्ये 150 टक्के पाऊस बरसला. आतापर्यंत वार्षिक पर्जन्यमानाच्या 131 टक्के पाऊस पडला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper