अलिबाग : प्रतिनिधी
देशभरात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात ‘कोरोना’ग्रस्तांवर उपचारासाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात सर्व अत्यावश्यक आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
राज्यात अद्याप कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून आले नसले तरी देशातील काही भागात कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून रायगड जिल्हा रुग्णालयातील आंतररुग्ण विभागात ‘कोरोना’ग्रस्तांवर उपचारासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. विलगीकरण कक्ष असे या कक्षाचे नामकरण करण्यात आले आहे. या कक्षात एकाच वेळी सात रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक यंत्रणा आणि औषधसाठा तयार ठेवण्यात आला आहे. रक्त नमुने तपासणीसाठीही व्यवस्था तत्पर ठेवण्यात आली आहे.
या कक्षात उपचार देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात फिजिशियन म्हणून कार्यरत डॉ. पडोळे या विलगीकरणाचे प्रमुख असणार आहेत.
जिल्ह्यात सध्यातरी कोरोना विषाणूचा संशयित रुग्ण आढळून आलेला नाही, मात्र आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना करून यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
-डॉ. प्रमोद गवई, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड
RamPrahar – The Panvel Daily Paper