माणगाव : प्रतिनिधी
श्रावण महिन्यापूर्वी येणार्या गटारी अमावस्येचा उत्साह खवय्यांमध्ये यंदाही दिसून आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेला लॉकडाऊन अंशतः शिथिल झाल्याने अनेकांनी घराबाहेर पडत चिकन, मटण व अन्य मांसाहारी पदार्थ खरेदी करण्यासाठी दुकानांसमोर रांगा लावल्या होत्या. विशेष म्हणजे दर वाढूनही लोकांनी खरेदीत कसर केली नाही, मात्र या वेळी काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले.
रायगड जिल्ह्यात 15 जुलैपासून लॉकडाऊन जाहीर झाल्याने गटारीकडे डोळे लावून बसलेल्या खवय्यांची निराशा झाली होती, परंतु गटारीच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील लॉकडाऊन काही अंशी शिथिल झाला. मग रविवारी सकाळीच मांस खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा लागल्या. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रतिकिलो 500 ते 550 रुपये असणारे बोकडाचे मटण गटारीच्या दिवशी 650 रुपयांच्या पुढे गेले, तर चिकनच्या दरानेही 240 रुपयांचा पल्ला गाठला. लॉकडाऊन काळात मांसाहारी पदार्थांची झालेली ही वाढ सर्वसामान्यांना परवडणारी नसून अनेकांनी या भाववाढीविरोधात नाराजी व्यक्त केली. तरीही श्रावण महिना सुरू होत असल्याने गटारीनिमित्त चिकन, मटणाची खरेदी करण्यात आली.
सर्वसामान्य लोकांना चिकन, मटणाचे भाव परवडणारे नाहीत. यावर नियंत्रण असले पाहिजे. या महागाईत सण कसे साजरे करायचे, हा प्रश्न आहे.
-दत्ताराम यादव, माणगाव
लॉकडाऊन, वाहतुकीची मर्यादा तसेच पशूंचीही कमतरता आहे. घरपोच सेवेमुळे काही ठिकाणी भाव वाढले आहेत, पण आम्ही 600पेक्षा कमी भावाने विक्री केली.
-दिनेश मोंडे, मटण विक्रेता
RamPrahar – The Panvel Daily Paper