कर्जत : बातमीदार
रायगड जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात होणार्या 25 वर्षा खालील खेळाडूंसाठी 20-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रायगड प्रीमिअर लिग कमिटीमार्फत करण्यात आले आहे. या स्पर्धेत खेळणार्या खेळाडूंचा नुकताच बोली पद्धतीने लिलाव (ऑक्शन) झाला. रायगड जिल्ह्यातील खेळाडूंचा लिलाव पनवेल तालुक्यातील मानघर येथील छाया रिसॉर्टमध्ये करण्यात आला. एकूण आठ संघांमध्ये ही स्पर्धा होणार असून रायगड जिल्ह्यातील सुमारे चारशे खेळाडूंनी या स्पर्धेत ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरून आपला सहभाग नोंदवला आहे. या खेळाडूंना ऑक्शन पद्धतीने आठ संघांचे संघ मालकांनी आभासी पॉईंट्स प्रकाराने आपापल्या संघात दाखल करून घेतले आहे.
प्रत्येक संघात 15 खेळाडूंचे ऑक्शनद्वारे पथक तयार करण्यात आले. दरम्यान, ज्या खेळाडूंचे लिलाव (ऑक्शन) झालेले नाही अशा सर्व खेळाडूंना स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी आयोजकांनी अशा राखीव खेळाडूंसाठी सामन्याचे नियोजन केले आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्या 16 खेळाडूंना स्पर्धेच्या धर्तीवर आठ संघांमध्ये स्थान देण्यात येईल.
या वेळी सिडकोच्या एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष निलेश तांडेल, प्रभाकर घरत, ओएनजीसीचे उपमहाव्यवस्थापक, सिडको युनियनचे उपाध्यक्ष विनोद पाटील, सचिव जे. टी. पाटील, जिल्हा परिषद सदस्य रवी पाटील, सुप्रसिद्ध उद्योजक मार्फी क्रीयाडो, लायन्स क्लब खोपोलीचे अध्यक्ष महेश राठी, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदीप नाईक, तसेच विजय खानावकर, अॅड. विक्रांत घरत, रायगड प्रीमिअर लिगचे अध्यक्ष राजेश पाटील, सचिव जयंत नाईक, उपाध्यक्ष आनंद घरत, डॉ. राजाराम हुलवान, खजिनदार कौस्तुभ जोशी, प्रदीप खलाटे, सुबोध दरणे, जितेंद्र नाईक, अॅड. पंकज पंडित, शंकर दळवी, संदीप जोशी, अमोल येरुणकर आदींसह रायगड जिल्ह्यातील खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper