मुंबई ः प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदारांचे पक्षांतर सुरू असून आता त्यात राष्ट्रवादीचा गड मानला जाणार्या रायगड जिल्ह्याचाही नंबर लागला आहे. जिल्ह्यातील दिग्गज नेते खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे व श्रीवर्धनचे विद्यमान आमदार अवधूत तटकरे राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा शिवसेना प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. गुरुवारी (दि. 29) त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन दिवसांत ते याबाबत निर्णय जाहीर करणार आहेत. याआधीही त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
-काका-पुतण्यात वाद?
सुनील तटकरे व अवधूत तटकरे यांच्यात पूर्वीपासून वाद आहेत. सुनील तटकरे हे आपली कन्या आदितीला आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या विचारात आहेत. याची कुणकूण लागल्याने अवधूत यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper