जम्मू-काश्मीरसंबंधीचे कलम 370 हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी जाहिरनाम्यातील एका महत्त्वाच्या आश्वासनाची पूर्तता केली. एक देश, एक प्रधान, एक विधान या तत्त्वानुसार भारत खर्या अर्थाने अखंड केला. देशाच्या तमाम जनतेने या धाडसी निर्णयाचे मुक्त कंठाने कौतुक केले. पण राहुल गांधी यांच्या मते मात्र तो आततायीपणा होता.
तब्बल 134 वर्षांचा इतिहास आणि परंपरा मिरवणार्या काँग्रेस पक्षाची वर्तमानात मात्र दयनीय अवस्था झालेली दिसते. केवळ आणि केवळ मोदी द्वेषाच्या जोरावर उभा असलेला हा विरोधी पक्ष आता विलयाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याची ठळक चिन्हे दिसत आहेत. राहुल गांधी यांच्या हाती पक्षाची सूत्रे गेल्यानंतर येणार्या प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची पिछेहाटच झाली. अर्थात याला कारणीभूत एकटे राहुल गांधी नव्हते. वर्षानुवर्षे सत्ता भोगणार्या त्यांच्या पक्षातीलच काही धेंडांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आणि भारतातील जनता काँग्रेस पक्षाच्या कारभाराला कमालीची उबगली. पाच वर्षांपूर्वी काँग्रेस पक्ष सत्तेबाहेर गेला असला तरी त्या पक्षाच्या भ्रष्ट मनोवृत्तीची चिन्हे कायम आहेत. पैशाच्या अफरातफरीच्या खटल्याच्या निमित्ताने सीबीआयच्या कोठडीत जाऊन पडलेले काँग्रेसचे एकेकाळचे अर्थमंत्री पी. चिदंबरम हे त्याचे ढळढळीत उदाहरण आहेत. लागोपाठ होणार्या पराभवांनी काँग्रेस पक्षाचा सत्तेचा माज बर्यापैकी उतरला असून या पक्षाची बौद्धिक दिवाळखोरी मात्र जोमाने वाढताना दिसते आहे. काश्मीर खोर्यात शांतता राखली जावी यासाठी काही कठोर निर्णय घेणे भाग होते. त्यानुसार तेथील स्थानिक नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले. अनेक समाजकंटकांची धरपकड करण्यात आली. बहुतांश ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली. गेल्या वीस दिवसांत तेथील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या काळात दगडफेकीचे तुरळक प्रकार वगळता तिथे एकही अनुचित घटना घडलेली नाही किंवा बंदुकीची एकही गोळी देखील सुटलेली नाही. काश्मीरमधील चित्र अशातर्हेने आशादायक असले तरी राहुल गांधी आणि त्यांच्या पिट्ट्यांना मात्र ते मान्य नाही. मान्य नव्हते, असे आता म्हणावे लागेल कारण बुधवारी सकाळी याच राहुल गांधींनी शहाजोगपणे घुमजाव करीत आपली आणि आपल्या पक्षाची बौद्धिक दिवाळखोरी जाहीर करून टाकली. मोदी-शहा यांचा निर्णय काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना निमंत्रण देणारा ठरेल अशी टिप्पणी करणारे राहुल गांधी आता मात्र काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याची ग्वाही देऊ लागले आहेत. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून पाकिस्तान किंवा अन्य कुठल्याही देशाने त्यात हस्तक्षेप करण्याचे कारण नाही असे प्रतिपादन आपल्या ताज्या ट्वीटमध्ये करुन राहुल गांधी यांनी एका अर्थी केंद्र सरकारच्या अपाययोजनांचे समर्थनच केले आहे. हे शहाणपण इतक्या अशीरा का सुचले असा प्रश्न कुणालाही पडेल. त्याची मेख पाकिस्तानने भारताविरोधात संयुक्त राष्ट्रांना पाठवलेल्या तक्रारीच्या पत्रात आहे. भारत सरकार काश्मीरमध्ये दमनशाही करीत असल्याची तक्रार पाकिस्तानने नोंदवली असून त्यात राहुल गांधी यांच्या वक्तव्यांचा चक्क हवाला देण्यात आला आहे. ‘उचलली जीभ, लावली टाळ्याला’ या म्हणीनुसार राजकारण केले की असे तोंडघशी पडायला होते आणि पराभव पदरी पडतो. काँग्रेसला नव्याने आलेले हे ताजे शहाणपण यापुढे टिकून राहो हीच अपेक्षा.
RamPrahar – The Panvel Daily Paper