नागोठणे : प्रतिनिधी येथील रिलायन्स कंपनीविरुद्ध प्रकल्पग्रस्तांनी पुकारलेल्या आंदोलनाला यश आले आहे. पहिल्या टप्प्यात 351 प्रकल्पग्रस्तांना ठेकेदारीत नोकरी मिळण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून, उर्वरित प्रकल्पग्रस्तांनासुद्धा नोकरीत घेण्याचा शब्द मिळाला आहे. त्यामुळे आंदोलनाला सोमवारी (दि. 18) 53व्या दिवशी स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी जाहीर सभेत केली. या सभेला संघटनेचे सल्लागार राजेंद्र गायकवाड, जिल्हाध्यक्ष शशांक हिरे, स्थानिक सरचिटणीस गंगाराम मिणमिणे, अध्यक्ष चेतन जाधव, सुरेश कोकाटे, प्रबोधिनी कुथे, मोहन पाटील, उषा दाभाडे, एकनाथ पाटील, सुजित शेलार आदींसह पदाधिकारी आणि प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. अॅड. कोळसे-पाटील यांनी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, आपल्याला पूर्ण यश मिळाले नसले तरी आपण आज यशस्वी झालो आहोत असे मी मानतो. लढाई अजून संपलेली नाही. आपल्या मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जातील असा शब्द रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिला आहे. आतमध्ये नोकरीसाठी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांनी बाहेरच्या 275 जणांना कधीही विसरून चालणार नाही. यांच्या न्याय्य हक्कासाठी आपल्याला पुढे लढतच राहायचे आहे. 53 दिवसांच्या या आंदोलनाने अहिंसेच्या मार्गाने कसे लढायचे हे नक्कीच शिकवले गेले असल्याचे राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले. शशांक हिरे, गंगाराम मिणमिणे, मोहन पाटील, नारायण म्हात्रे यांचीही समयोचित भाषणे झाली. सभेचे सूत्रसंचालन एकनाथ पाटील आणि सुजित शेलार यांनी केले. सभा संपल्यावर प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांनी अॅड. कोळसे-पाटील यांच्यासमवेत सभेच्या ठिकाणी येऊन उपस्थित आंदोलनकर्त्यांना धन्यवाद दिले.
Check Also
ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …
RamPrahar – The Panvel Daily Paper