महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. बॅ. ए. आर. अंतुले यांनी रेवस -रेड्डी असा कोकणासाठी सागरी महामार्ग बांधण्याचे स्वप्न पाहिले होते. या मार्गावरील महत्वाचा टप्पा म्हणजे रेवस-करंजा पूल. त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या प्रत्येक सरकारने हे पूल पूर्ण करण्याची घोषण केली. मात्र पूल काही बांधले गेले नाही. पुलाची घोषणा झाली की, काही दिवस या पुलाची चर्चा होते. नंतर ये रे माझ्या मागल्या. आताच्या नगरविकास मंत्र्यांनीही या पुलासाठी निविदा प्रक्रिया ऑक्टोबरपर्यंत सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा हा पूल चर्चेत आला आहे. ही केवळ घोषण न ठरता पुलाचे काम सुरू करून हा पूल बांधून लवकर पूर्ण केला पाहिजे. कोकणाच्या पर्यटन विकासासाठी तसेच अलिबागचा परिसर मुंबईच्या जवळ नेण्याासाठी, या भागाच्या विकासासाठी महात्वाचा असलेला रेवस – करंजा पूल होणे, ही काळाची गरज आहे. बॅ. ए. आर. अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी 1980 साली उरण आणि अलिबाग या दोन तालुक्यांना जोडण्यासाठी धरमतर खाडीवर रेवस-करंजा पूल बांधण्यासाठी मंजुरी दिली होती. त्याचे कामही सुरू झाले होते. दोन्ही बाजूंना जोड रस्ते बांधण्यात आले होते. परतु बॅ. अतुलेंचे मुख्यमंत्रीपद गेले आणि हा पूलही बारगळला. तेव्हापासून हा पूल हेलकावे खातोय. कोकणात सागरी महामार्ग प्रकल्पात रेवस-करंजा याच्या दरम्यानचा हा पूल प्रस्तावित आहे. हा पूल उरण तालुक्यातील चिर्ले गावापर्यंत येत असलेल्या सिडकोच्या रस्त्याला जोडला जाणार आहे. या पुलासाठी 850 कोटी रुपयांचा निधी लागणार असून, प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी सीआरझेड आणि वन विभागाची परवानगी आवश्यक आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी नऊ हेक्टर जमिनीचे संपादनदेखील करावे लागणार आहे. शिवडी न्हावा-शेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प आणि हा पूल पूर्ण झाल्यास अलिबाग आणि मुंबईतील अंतर कमी होणार आहे. सध्या अलिबागहून उरणला जायचे असेल तर अलिबाग- वडखळ-खारपाडा असा प्रवास करावा लागतो. यात पैसा व वेळेचा अपव्यय होतो. हे टाळण्यासाठी प्रवाशी रेवस-करंजा असा तरीतून प्रवास करतात. पुढे जायचे असल्यास दुसर्या वाहनाने प्रवास करावा लागतो. तरीतून मोटारसायकल नेता येते. परंतु मोठी वाहने नेता येत नाहीत. त्यामुळे मोटारीने जायचे असल्यास खारपाडामार्गेच जावे लागते. रेवस-करंजा पूल झाला तर हा वळसा घालावा लागणार नाही. रेवस-करंजा पूल सुरू झाल्यास वाशी ते रेवस हे अंतर 39 कि. मी.ने कमी होईल. वाशी ते मांडवा हे अंतर 39 कि. मी., उरण-अलिबाग अंतर 44 कि.मी.ने, जेएनपीटी-अलिबाग अंतर 35 कि. मी. ने तर जेएनपीटी-मुरूड अंतर 36 कि. मी.ने कमी होईल. अलिबाग-मुबई प्रवास करण्यासाठी मुबई-गोवा महामार्गाने प्रवास कारावा लागातो. हे अंतरदेखील या पुलामुळे कमी होणार आहे. पूल पूर्ण झाल्यावर अलिबाग मुबईच्या आणखी जवळ येईल. या पुलासंदर्भात नुकतीच मंत्रालयात एक बैठक झाली. बैठकीला एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, आणि नगरविकास आणि एमएसआरडीसीचे अन्य अधिकारी उपस्थित होते. या पुलासाठी निविदा प्रक्रिया ऑक्टोबरपर्यंत सुरू करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा हा पूल चर्चेत आला आहे. बॅ. ए. आर. अंतुले यांच्यानंतर रेवस-करंजा पूल व्हावा, यासाठी कुणी प्रयत्न केले नाहीत. हा पूल लवकरात लवकर बांधला जावा, अशी मागणी केली जात होती. मात्र हा पूल काही लोकांच्या धंद्याच्या आड येणारा होता. हा पूल होण्यापेक्षा तो कसा होणार नाही यासाठीच प्रयत्न केले गेले. पूल बांधण्यापेक्षा खाडीतील गाळ काढण्यावर लक्ष केंद्रीत केले. दरवर्षी रेवस खाडीतील गाळ काढला जातो. त्यासाठी करोडो रुपये खर्च केला जातो. एवढी वर्षे या खाडीतील गाळ काढण्यासाठी शासनान खर्च केला, त्या खर्चात रेवस-करंजा पूल बांधून झाला असता. मधुकर ठाकूर आमदार झाल्यानंतर त्यांनी या रेवस-करंजा पुलासाठी पुन्हा प्रयत्न केले. ते आमदार असताना त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे रेवस-करंजा पुलाची मागणी केली होती. ती मान्यदेखील करण्यात आली होती. पुलाच्या बांधकामासाठी तरतूद करण्यात आली होती. परंतु पुलाचे काम काही सुरू झाले नाही. रेवस-करंजा हा पूल केवळ अलिबाग व उरण या दोन तालुक्यांना जोडणार असला तरी तो कोकणाच्या पर्यटन विकासाठीदेखील महत्वाचा ठरणार आहे. उरण व अलिबाग परिसरात येत असलेले प्रकल्प, या परिसरात होत असलेली विकास कामे आणि भविष्याचा विचार करता रेवस -करंजा पूल बांधला जाणे ही काळाची गरज आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांचेही प्रयत्न
आमदार प्रशांत ठाकूर एमएमआरडीएचे सदस्य असताना त्यांनी रेवस-करंजा पुलासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच एमएमआरडीएने या पुलाच्या कामासाठी तेव्हा आपल्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली होती. त्यावेळीही रेवस-करंजा पुलाचे काम मार्गी लागेल असे वाटत होते. मात्र त्यानंतर एमएमआरडीएचे या कामाकडे दुर्लक्ष झाले.
-प्रकाश सोनवडेकर
RamPrahar – The Panvel Daily Paper