पनवेल : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलकडून पनवेल महापालिकेच्या सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी एक असे सहा ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1 (गावदेवी पाडा) या ठिकाणी एक सोनोग्राफी मशीन देण्यात आले आहे. एमजीएममधील सोनोग्राफी तज्ज्ञ डॉक्टर रोज 10 ते 1 या वेळेत या प्राथमिक आरोग्य केंद्रावर रुग्णांच्या तपासणीसाठी येणार आहेत.
रोटरी क्लबचे सदस्य तसेच महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील तसेच रोटरी क्लबचे गर्व्हनर अनिल परमार, माजी गव्हर्नर डॉ. गिरीश गुणे, अध्यक्ष लक्ष्मण पाटील, कार्यक्रमाचे समन्वयक अमोद दिवेकर, प्रभारी मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रेहाना मुजावर, सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, डॉ. मनीषा चांडक, डॉ. प्रियंका माळी, संगीता पाटील यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 2) मनपा आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर व सोनोग्राफी मशीन सुपूर्द करण्यात आले.
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी येणार्या रुग्णांना अनेकवेळा ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यास या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरचा उपयोग होणार आहे. ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरसोबत किमान 50 रुग्णांना ऑक्सिजन लेव्हल तपासताना लागणारी पूरक सामग्रीही रोटरी क्लबकडून देण्यात आली. त्याचबरोबर या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरची तीन वर्षे मोफत सर्व्हिसिंग करून देण्यात येणार आहे.
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1 (गावदेवी पाडा) या ठिकाणी नागरिकांच्या तपासणीकरिता रोटरी क्लबकडून सोनोग्राफी मशीन देण्यात आले आहे. एमजीएममधील सोनोग्राफी तज्ज्ञ डॉक्टर रोज 10 ते 1 वाजता या आरोग्य केंद्रावर रूग्णांच्या तपासणीसाठी येणार आहेत. सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून केली जाणारी तपासणी पूर्णत: मोफत असणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब आणि महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
Check Also
केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा
पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …
RamPrahar – The Panvel Daily Paper