बांगलादेशला हरवून भारत उपांत्य फेरीत
बर्मिंगहम : वृत्तसंस्था
विश्वचषक स्पर्धेत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत भारताने बांगलादेशवर 28 धावांनी विजय मिळवून स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे तिकीट पक्क केले आहे. भारताने दिलेल्या 315 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 286 धावांत संपुष्टात आला. भारतीय संघाच्या विजयात सलामीवीर रोहित शर्मा आणि गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी मोलाचे योगदान दिले.
भारताने तीनशेहून अधिक धावा केल्या तरी बांगलादेशने भारताला सामन्याच्या 48व्या षटकापर्यंत विजयासाठी झुंजवले. मोहम्मद सैफुद्दीनने अखेरच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी करीत झुंजार अर्धशतक ठोकले. सामन्यात बांगलादेशच्या दिशेने पारडे झुकते असल्याचे चित्र निर्माण झाले असताना जसप्रीत बुमराहने भारतासाठी तारणहार ठरला. बुमराहने रुबेल हुसेन आणि मुस्तफिजुर रेहमानला त्रिफळाचीत करीत बांगलादेशचा डाव संपुष्टात आणला. सैफुद्दीनची नाबाद 51 धावांची खेळी व्यर्थ ठरली. बांगलादेशच्या डावात शाकीब अल हसननेही 66 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. या पराभवासह बांगलादेशचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक चार बळी घेतले, तर पांड्याने तीम गडी बाद करीत त्याला उत्तम साथ दिली. चहल, शमी आणि भुवीला प्रत्येकी एक बळी मिळाला.
तत्पूर्वी सलामीवीर रोहित शर्माचे शानदान शतक (104), लोकश राहुलचे अर्धशतक (77) आणि ऋषभ पंतच्या (48) धावांच्या बळावर भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी 315 धावांचे लक्ष्य ठेवले होते. एकवेळ रोहित आणि राहुल खेळपट्टीवर असताना भारत यापेक्षाही मोठी धावसंख्या उभारेल असे वाटले होते, पण रोहित बाद झाल्यानंतर मोठी भागीदारी होऊ शकली नाही. भारताच्या मधल्या फळीचे अपयश पुन्हा जाणवले. मुस्ताफिझूर रहमानच्या बांगलादेशकडून यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 10 षटकांत 59 धावांमध्ये भारताचा निम्मा संघ तंबूत पाठवला.
भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने आजच्या सामन्यात दोन बदल केले होते. कुलदीप यादव आणि केदार जाधवला संघातून वगळण्यात आले व त्यांच्या जागी भुवनेश्वर कुमार आणि दिनेश कार्तिकला संधी दिली होती. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात कुलदीप महागडा गोलंदाज ठरला होता. त्यामुळे त्याच्या जागी भुवनेश्वरला संधी देण्यात आली होती.
RamPrahar – The Panvel Daily Paper