आरोग्य प्रहर

लठ्ठपणावर मात करण्यासाठी धावणे, चालणे, व्यायाम करणे असे शारीरिक व्यायाम केले जातात, मात्र लठ्ठपणासाठी मानसिकताही कारणीभूत असते. त्यामुळे शारीरिक व्यायामाबरोबर मानसिक स्वास्थ्य सुधारणार्या उपचारांची मदत घेतली तर लठ्ठपणावर मात करता येते.
विविध कारणांमुळे येणारे नैराश्य वजन वाढण्याचे महत्त्वाचे कारण आहे. नैराश्यग्रस्त रुग्ण खूप कमी खातात व वजन कमी झाल्यामुळे अशक्तपणा येतो, मात्र हा प्रकार सर्वच रुग्णांबाबत होत नाही. बहुतांश रुग्ण मानसिक अस्थैर्य व नैराश्यांमुळे अधिक खातात. त्या तुलनेत शारीरिक हालचाल होत नाही व वजन वाढत जाते.
सतत खाणे हा मानसिक आजार बहुतांश महिलांत आढळतो. बिघडलेले मानसिक स्थैर्य पुन्हा मिळवण्यासाठी रुग्ण सतत खातो. असुरक्षिततेची भावना, आत्मविश्वासाचा अभाव यांसारख्या भावना सातत्याने येत राहिल्यास त्यावर नियंत्रण आणण्यासाठी किंवा या भावना विसरण्यासाठी खाण्याचे प्रमाण वाढते. ही कृती इतक्या नकळतपणे घडते की ते संबंधित व्यक्तीच्या लक्षातही येत नाही. हा आजार तरुण महिलांत अधिक प्रमाणात दिसतो व कालांतराने लठ्ठपणाला तोंड द्यावे लागते. नैराश्यामुळे दैनंदिन आयुष्यात बदल होत असल्याचे लक्षात आल्यावर डॉक्टरांचा सल्ला घ्या. सतत खाणे व खाल्लेले अन्न शरीराबाहेर काढणे अशा प्रकारच्या क्रिया जर सातत्याने होत असतील, तर मानसिक आजाराची लागण होण्याची शक्यता आहे. अशा वेळी समुपदेशनासोबत औषधे देऊन उपचार केले जातात. योगा व व्यायामाच्या माध्यमातून मानसिक आरोग्य सुधारणे शक्य असते, तसेच श्वासावर नियंत्रण ठेवणारे व्यायाम केल्याने मानसिक आजारावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. वारंवार पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. सतत खात असल्याचे लक्षात आल्यावर रुग्णाने अंकमोजणी सुरू करण्याची पद्धत आजारात खाण्यावरील लक्ष दुर्लक्षित करण्यास मदत करते. मानसिक आजारावरील रुग्णांसाठी हे उपचार सोपे नसले तरी कालांतराने हे साध्य होते. समुपदेशनातून रुग्णाला मानसिक आजार किंवा अस्थिरता निर्माण होण्याची नेमकी कारणे जाणून घेण्यास मदत होते. रुग्णाने मानसिक आजार स्वीकारून त्यावर उपचार करावे. अनेकदा हे मानसिक आजार आनुवंशिकही असू शकतात.
RamPrahar – The Panvel Daily Paper