उरण : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नसली तरी यादरम्यान मात्र उरणमध्ये मासळी, मटण, चिकन आणि अंड्यांचे भाव भलतेच कडाडले आहेत. परिणामी हे कडाडलेले भाव लॉकडाऊनच्या काळातही सामान्य खवय्यांचे खिसे रिते करू लागले आहेत.
देशभरात झपाट्याने वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी तसेच लॉकडाऊनची घोषणा केली. यादरम्यान भाजीपाल्याचे भाव चांगलेच वधारले असतानाच पहिल्या टप्प्यापासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे समज गैरसमजातून मासळी, मटण, चिकन आणि अंड्यांचे भाव चांगलेच घसरले होते. चिकन, अंडी खरेदीसाठी नागरिक उत्सुक नसल्याने दुकाने बंद असतानाही चिकनचे दर प्रतिकिलो 100, तर अंडी 40 ते 45 रुपये डझन भावाने बाजारात विकली जात होती.
बंद दुकाने आणि घसरत्या दरामुळे चिकनचे घाऊक, किरकोळ व्यापारी आणि पोल्ट्री व्यावसायिकांवर उपासमारीचे संकट कोसळले होते. पहिल्या आणि दुसर्या लॉकडाऊननंतर विक्रीसाठी दुकानदारांना दिलेल्या सवलतीनंतर मासळी, मटण, चिकनचे दर बर्यापैकी वधारले होते. तिसर्या लॉकडाऊनच्या टप्प्यानंतर मात्र मासळी, मटण, चिकनचे दर गगनाला भिडले आहेत. लॉकडाऊननंतर मासळीची आवक घटल्याने मासळीच्या दरवाढीला सीमाच राहिली नाही, तर चिकनचे दर 100-120वरून थेट 240-250 रुपयांपर्यंत पोहचले आहेत.
अंड्यांच्या दरानेही उसळी घेतली असून 40 ते 45 रुपये डझन भावाने बाजारात विकली जाणारी अंडी आता 75-80 प्रतिडझनाने विकली जात आहेत. मटणाचेही दर 500-550वरून 750-800 रुपयांपर्यंत वधारले आहेत. त्यामुळे मासळी, मटण, चिकन आणि अंड्यांचे विक्रेते भरमसाठ दराने विक्री करून लॉकडाऊनदरम्यान झालेले आर्थिक नुकसान एकदम भरून काढताहेत की काय, अशा संतप्त प्रतिक्रिया खवय्यांकडून व्यक्त होत आहेत. माल वाहतुकीसाठी अद्यापही शासनाकडून योग्य प्रमाणात व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे एजंटकडून मिळेल त्या भावाने मालाची खरेदी करावी लागत आहे.याआधी बाजारपेठेत स्वतः जाऊन मालाची खरेदी केली जात होती, मात्र एजंटकडूनच चढ्या भावाने माल खरेदी केल्यानंतर आम्हीही आर्थिक नुकसान टाळण्यासाठी भरमसाठ दराने मालाची विक्री करीत असल्याचा विसंगत दावा मासळी, मटण, चिकन आणि अंडी विक्रेत्यांकडून केला जात आहे. मासळी, मटण, चिकन आणि अंडी विक्रेत्यांच्या भरमसाठ दरावर अंकुश ठेवण्यासाठी शासनाने यंत्रणाही उभारली आहे, मात्र अशा आपत्कालीन स्थितीत या यंत्रणाही हतबल ठरल्याचे चित्र दिसत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper