Breaking News

लॉर्ड्सवरही पावसाची बॅटिंग

इंग्लंडविरुद्ध भारताची दमदार सुरुवात

लंडन ः वृत्तसंस्था

भारत-इंग्लंड दुसर्‍या कसोटी सामन्यातही पावसाने व्यत्यय आणला आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार बुधवारी (दि. 12) लॉर्ड्सवरील कसोटीत पाऊस पडण्याची तुरळक शक्यता वर्तवण्यात आली होती, पण पहिल्याच दिवशी पावसानं हजेरी लावली अन् खेळ उशीरा सुरू करावा लागला. त्यानंतर पावसामुळेच सहा मिनिटे आधी लंच घ्यावा लागला.

इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने नाणेफेक जिंकताना टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले अन् रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी चांगली सुरुवात करून दिली. लंच ब्रेकपर्यंत भारताने एकही विकेट न गमावता 46 धावा केल्या होत्या. त्यात रोहित शर्माच्या 35 आणि लोकेशच्या 10 धावांचा समावेश आहे.

शार्दूल ठाकूर दुखापतीमुळे या सामन्यात खेळणार नसल्याचे कर्णधार विराट कोहलीनं आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे त्याच्या जागी कोणाला संधी मिळते याची उत्सुकता होती आणि इशांत शर्माला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली, तर इंग्लंडने संघात तीन बदल केले. प्रमुख गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने दुखापतीमुळे मालिकेतूनच माघार घेतली आहे. त्याव्यतिरिक्त या सामन्यात झॅक क्रॅवली व डॅन लॉरेन्स यांना विश्रांती दिली असून त्यांच्याजागी हसीब हमीद, मोईन अली आणि मार्क वूड यांची निवड करण्यात आली आहे.

पहिला सामना नॉटिंगहॅममध्ये खेळला गेला होता. शेवटच्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द झाला. सामन्याचा निकाल पावसामुळे येऊ शकला नाही आणि सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. सामना अनिर्णित राहिल्यानंतर, दोन्ही संघांना 2021-23च्या विश्व कसोटी चॅम्पियनशिपसाठी प्रत्येकी चार गुण देण्यात आले, मात्र सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी दोन्ही संघांनी षटकांची गती संथ राखल्याबद्दल दोषी ठरवले. त्यानंतर दोन्ही संघांच्या खात्यातून प्रत्येकी दोन गुण पेनल्टी ओव्हर म्हणून कापले गेले आणि आता दोघांचेही चारऐवजी प्रत्येकी दोन गुण आहेत. याशिवाय दोन्ही संघांच्या खेळाडूंना सामना शुल्काच्या 40 टक्के दंड भरावा लागेल.

लॉर्ड्सवर भारत आणि इंग्लंडदरम्यान एकूण 18 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 12 सामन्यांत इंग्लंडने विजय मिळवला आहे. भारताने फक्त दोन सामन्यात विजय मिळवला आहे, तर चार सामने अनिर्णीत ठरले आहेत. या मैदानात इंग्लंडची विजयी टक्केवारी ही 66 टक्के आहे, तर भारताची विजयी टक्केवारी 11 टक्के आहे. भारताला 1986 आणि 2014 सालात विजय मिळाले होते.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply