मान्यवरांची उपस्थिती; विद्यार्थ्यांचे कौतुक
पनवेल ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये तृतीय इन्वेस्टीचर्स सेरेमनी शनिवारी (दि. 5) साजरा झाला. संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि स्कूलचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर व नायब तहसीलदार सुनील जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या समारंभात शालेय मंत्रिमंडळ स्थापन करून विद्यार्थ्यांचा शपथविधी झाला.
या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य जे.एम. म्हात्रे, वाय.टी. देशमुख, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, ‘रयत’चे रायगड उपविभागीय अधिकारी विलासराव जगताप, पीआरओ बाळासाहेब कारंडे, खारघरच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यपिका राज अलोनी, नवीन पनवेलच्या सीकेटी विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक अविनाश कुलकर्णी, पर्यवेक्षिका रुहल दुबे, उलवेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल मुख्याध्यापक श्री. सुतार, कोमल गायकवाड यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
इन्वेस्टीचर्स सेरेमनीत विद्यार्थ्यांवर सोपवण्यात आलेली जबाबदारी ते यशस्वीरीत्या बजावतील, असा विश्वास या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त करून कामोठ्यातील ही शाळा रयत शिक्षण संस्थेमधील एक नामवंत शाळा आहे, असे गौरवोद्गार काढले. शाळेचे नावलौकिक कायम राखणे हे आपल्या सर्वांचेच काम आहे, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली.
RamPrahar – The Panvel Daily Paper