पनवेल ः रामप्रहर वृत्त
लोकशाही भक्कम करण्यासाठी आपण एकत्र येऊया, लोकशाही जागृत ठेवण्याकरिता सारे मिळून प्रयत्न करत राहूया, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 25) येथे केले. आणीबाणी कालावधीत लोकशाहीच्या लढ्यांमध्ये बंदिवास भोगावा लागलेल्या मान्यवरांचा सन्मान या विशेष कार्यक्रमाचे आयोजन पनवेल येथील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास महापालिका कार्यक्षेत्रातील आणीबाणी कालावधीत बंदिवास भोगावा लागलेले सात मान्यवर, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, महापालिका आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, भाजप शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव, माजी नगरसेवक अनिल भगत, गणेश कडू, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, प्रसेनजित कारलेकर, रविकिरण घोडके, स्वरूप खारगे, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, लेखा परीक्षक निलेश नलावडे, शहर अभियंता संजय कटेकर, सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, डॉ. रूपाली माने, सुबोध ठाणेकर आणि नागरिक उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, आणीबाणीच्या काळात लोकशाही पुनर्प्रस्थापित करण्यासाठी, अन्याय-अत्याचार थांबविण्यासाठी ज्यांनी सक्रिय भूमिका बजावली अशा मान्यवरांच्या कर्तृत्वाचा पनवेलकरांना अभिमान आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे यांनी केले. मनपातर्फे या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी या वेळी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी मानले. कार्यक्रमास पनवेलकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, आणीबाणीत बंदिवास भोगलेल्या सरिता प्रभाकर गांधी या आजारी असल्याकारणाने त्या कार्यक्रमास उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांना महापालिकेच्या वतीने घरी जाऊन सन्मानित करण्यात आले.
आणीबाणी विशेष स्मरण प्रदर्शन
या विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या तळमजल्यावर ‘आणीबाणी विशेष स्मरण प्रदर्शन’ 2 जुलपर्यंत भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले. यामध्ये स्वाक्षरी मोहीम राबविण्यासाठी खास बोर्डची सोय करण्यात आली आहे. या बोर्डवर मान्यवरांनी तसेच महापालिका अधिकारी व कर्मचार्यांनी स्वाक्षरी केली. देशात 25 जून 1975 ते 3 मार्च 1977 या कालावधीत आणीबाणी घोषित करण्यात आली होती. या घटनेला 50 वर्षे पूर्ण होत असताना भरविण्यात आलेल्या विशेष प्रदर्शनाला महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Check Also
ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …
RamPrahar – The Panvel Daily Paper