Breaking News

लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यासाठी आज रणसंग्राम

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात देशभरातील 59 मतदारसंघांत आज मतदान होत आहे. गेल्या सहा टप्प्यांतील निवडणूक प्रचारामुळे उडालेला धुरळा आता शमला आहे. अखेरच्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी जय्यत तयारी केली आहे.

या अखेरच्या टप्प्यात आठ राज्यांमध्ये लोकसभेसाठी मतदान होत आहे. त्यात बिहार 8, हिमाचल प्रदेश 4, झारखंड 3, मध्य प्रदेश 8, पंजाब 13, उत्तर प्रदेश 13, पश्चिम बंगाल 9 आणि चंदीगड 1 अशा 59 लोकसभा मतदारसंघांत मतदान होत आहे. 11 एप्रिल 2019 रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. त्यानंतर 18, 23, 29 एप्रिल रोजी अनुक्रमे दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर 6 आणि 12 मे रोजी पाचव्या आणि सहाव्या टप्प्याचे मतदान पार पडले होते.

लोकसभा निवडणूक ही विधानसभेची लिटमस टेस्ट मानली जात असल्याने या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. आतापर्यंत झालेल्या सहा टप्प्यांतील निवडणूक काही राज्यांच्या अपवाद वगळता शांततामय आणि सुरक्षित वातावरणात पार पडली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुध्द सर्व विरोधी पक्षांची महाआघाडी असा सामना पाहायला मिळाला. आज होणार्‍या अखेरच्या टप्प्यातील निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानेही योग्य ती तयारी केली असून निवडणूक निर्भय आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी कंबर कसली आहे. त्यानुसार प्रत्येक मतदारसंघात ईव्हीएम मशीनसह आपला कर्मचारी आणि अधिकारीवर्ग निवडणूक आयोगाने सज्ज ठेवला आहे. काही संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदारसंघांत अनुचित प्रकार रोखण्यासाठी ज्यादा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यात होणार्‍या निवडणुकीत अनेक दिग्गजांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद होणार आहे. लोकसभेच्या देशातील सर्व मतदारसंघांचा एकत्रित निकाल 23 मे रोजी लागणार असल्याने या अखेरच्या टप्प्यातील निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष निकालाकडे लागणार आहे.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply