पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते लोकार्पण
पनवेल ः रामप्रहर वृत्त
आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने वनवासी बांधवांसाठी फिरता दवाखान्याचे उद्घाटन महाराष्ट्र भूषण पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी, रायगड भूषण सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी यांच्या हस्ते रेवदंडा येथे झाले.
उरण विधानसभा मतदार क्षेत्राचे आमदार महेश बालदी हे वनवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी कायमच पुढाकार घेत असतात. वनवासी समाज हा कायमच मुख्य प्रवाहापासून काहीसा दुरावलेला समाज म्हणून ओळखला जातो. शिक्षणाचा अभाव असल्याने पर्यायाने रोजगार कमी असल्याने आपल्या आरोग्याच्या तक्रारींसाठी हे समाजबांधव दवाखान्यात न जाता त्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात. अशा परिस्थितीत या फिरत्या दवाखान्याचा मोठ्या प्रमाणात फायदा वनवासी बांधवांना होणार आहे.
या फिरत्या दवाखान्याचा शुभारंभ पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी यांच्या हस्ते रेवदंडा येथे झाले. या कार्यक्रमास आमदार महेश बालदी, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, खालापूर भाजपचे तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे, साई गावचे माजी सरपंच विद्याधर मोकळ, तारा गाचे विद्योगपती बाळुशेठ पाटील, माजी उपसरपंच विद्याधर जोशी, दिघाटीचे सरपंच अमित पाटील, पळस्पे जिल्हा परिषद युवा नेते मंगेश वाकडीकर, आपटाचे माजी सरपंच दत्ता पाटील, तसेच भारतीय जनता पक्षाचे उरण पनवेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच वनवासी बांधव उपस्थित होते.
आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने सुविधा
वनवासी बांधवांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये यासाठी आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांतून फिरता दवाखाना उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे या वनवासी समाजातील बांधवांना किरकोळ कारणासाठी दवाखान्यात न जाता या फिरत्या दवाखान्याद्वारे उपचार घेता येणार आहेत. आमदार महेश बालदी यांनी हा फिरता दवाखाना उपलब्ध केल्याने वनवासी समाजबांधवांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper