अलिबाग ः प्रतिनिधी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पुणे येथे सुरू झालेल्या वरिष्ठ गट आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामन्यात रायगडच्या संघाने एमसीव्हीएस या संघावर 14 धावांनी नाट्यमय विजय मिलवला. रायगडने पहिल्या सामन्याचे पूर्ण गुण वसूल केले. नाणेफेक जिंकून रायगड संघाने फलंदाजी स्वीकारली. रायगडाचा पहिला डाव 52 धावांतच आटोपला. एमसीव्हीएस संघाने पहिल्या डावात 136 धावा करून 84 धावांची आघाडी घेतली होती. रायगडाने दुसर्या डावात 191 धावा केल्या. सामना जिंकण्यासाठी एमसीव्हीएस संघाला दुसर्या डावात 108 धावा करायच्या होत्या, मात्र त्यांचा दुसरा डाव 93 धावांत गुंडाळून रायगडाने हा सामना 14 धावांनी जिंकला. संपूर्ण सामन्यात रायगडचा संघनायक सागर सावंत (सात बळी व 35 धावा), अभिषेक खातू (आठ बळी व 36 धावा) आणि सिद्धांत म्हात्रे (तीन बळी व 17 धावा) या तिघांच्या अष्टपैलू खेळामुळे रायगडने एमसीव्हीएस संघाविरुद्ध विजय साकारला. अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवल्याबद्दल रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते व सर्व सभासद तसेच रायगडच्या सर्व क्रिकेटप्रेमींनी आपल्या संघाचे मनापासून अभिनंदन केले आणि पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सागर सावंतने आपल्या दुसर्या व संघाच्या तिसर्या षटकामध्ये 0 धावेवर पहिला बळी मिळवून सुरुवात छान करून दिली. दुसर्या बाजूने डावखुरा फिरकी गोलंदाज सिद्धांत म्हात्रेने पहिली सातही षटके निर्धाव टाकून एक बळीही घेतला. त्यामुळे एमसीव्हीएमच्या फलंदाजांवर दडपण आले.
RamPrahar – The Panvel Daily Paper