धरण कुणाच्या हद्दीत येते यावरून बराच काळ चालढकल झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. तर धरणाजवळ अलीकडच्या काळात खणलेल्या विहिरांकरिता जे सुरुंगांचे स्फोट केले गेले, तेही कदाचित धरणाला तडे जाण्यास जबाबदार असावेत अशी भीती आहे. अर्थातच, विहिरींच्या कामांची माहिती देखील स्थानिक प्रशासनाकडे असणे अपेक्षित आहे. धरणाचे बांधकाम मुळातच निकृष्ट दर्जाचे होते का त्याची देखभाल, डागडुजी नीट केली गेली नाही हे आता चौकशीत उघडकीस येईलच. परंतु प्रशासकीय ढिसाळपणातून ही दुर्घटना घडली आहे हे निश्चित.पावसामुळे पुण्या-मुंबईत भिंती कोसळून कित्येकांचे बळी जाण्याच्या घटना ताज्या असतानाच रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटण्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेतही किमान 24 जणांचा बळी गेला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. ग्रामस्थांनी मे महिन्यापासूनच स्थानिक आमदार, खासदार तसेच प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष या धरणाला पडलेल्या भेगांकडे वेधण्याचा प्रयत्न केला होता, हेही आता उघडकीस आले आहे. त्यामुळेच निरपराध नागरिकांचे बळी घेणार्या या दुर्घटनेस जबाबदार कोण याबद्दलचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. अर्थातच सह्याद्रीच्या रांगांमध्ये, सातारा आणि चिपळूण तालुक्यांच्या सीमा भागात बांधण्यात आलेल्या या धरणाच्या क्षेत्रात पाण्याचा मोठा साठा जमा झाला होता. धरणाला मोठे तडे गेल्याचे स्थानिक पोलिसांच्या मंगळवारी उशीरा लक्षात आले. परंतु तलाठ्यांकडून धरणाच्या अगदी समीप असलेल्या ग्रामस्थांपर्यंत धोक्याची सूचना पोहोचेपर्यंत तिथे निजानीज झाली होती. काही ग्रामस्थांनी बचावासाठी अन्यत्र आश्रय घेण्याची लगबग केली देखील. परंतु रात्री साडेनऊ-दहाच्या सुमारास धरणाला मोठे भगदाड पडले आणि पाण्याच्या प्रचंड मोठ्या लोटात धरणाखाली असलेल्या तिवरे-बेंडवाडी गावातील 13 घरे वाहून गेली तर सात गावांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली. तिवरे-बेंडवाडीतील 24 जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती असून बुधवारी दुपारपर्यंत 11 मृतदेह हाती लागले होते. या परिसरातील शेकडो गावकर्यांची तहान भागवण्यासाठी तसेच शेतीसाठीही उपयुक्त पडेल म्हणून वीस वर्षांपूर्वी हे धरण बांधण्यात आले होते. स्थानिक शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांच्या बंधूंच्या कंपनीनेच ते बांधल्याचेही आता समोर आले आहे. धरणाला भेगा पडल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी स्थानिक शिवसेना खासदार विनायक राऊत यांचेही लक्ष त्याकडे वेधले. आमदार व धरणाशी संबंधित उपअभियंता कार्यालयाशी देखील पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानंतर तात्पुरती डागडुजी करण्यात आल्याचेही सांगण्यात येते. परंतु दुरुस्तीचे हे काम पुरेसे नव्हते हे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान आज राज्यात अन्य काही ठिकाणीही धरण वा पुलाला धोका निर्माण झाल्याचे समोर आले आहे. या स्वरुपाच्या घटना नोकरशाहीची ढिलाई व सरकारी कर्मचार्यांचा बेजबाबदारपणा दर्शवणार्या आहेत. तिवरे धरण प्रकरणात दोषींना शिक्षा होईलच. परंतु एकंदरच सरकारी कर्मचार्यांना धारेवर धरण्याची गरज स्पष्टपणे दिसते आहे. अर्थातच त्यांची ही अशी वृत्ती वर्षानुवर्षे तशीच राहिली आहे. प्रशासकीय यंत्रणेची ही बेपर्वाईची वृत्ती बदलण्यासाठी राजकीय नेतृत्वाला ठोस पावले उचलावी लागतील.
वाडी गिळली कुणी
Ramprahar News Team 3rd July 2019 महत्वाच्या बातम्या, संपादकीय Leave a comment 648 Views
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper