कर्जतमध्ये विद्युत देयकांची जाहीर होळी

कर्जत : बातमीदार
तालुका भारतीय जनता पक्षातर्फे सोमवारी (दि. 23) कर्जतमधील लोकमान्य टिळक चौकात वाढीव वीज बिलांची होळी करण्यात आली. या वेळी कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
वाढीव वीज बिल आणि बिल न भरल्यास वीज मीटर कापण्याचे सत्र महावितरण कंपनीने सुरू केले आहे. त्या विरोधात भारतीय जनता पक्ष कर्जत मंडलाच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले. शहरातील कपालेश्वर मंदिरासमोरील लोकमान्य टिळक चौकात भाजपच्या वतीने महावितरण कंपनीच्या वाढीव वीज बिलांची होळी करण्यात आली. भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर आणि जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामध्ये राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात भाजपचे जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, तालुका सरचिटणीस पंकज पाटील, उपाध्यक्ष गायत्री परांजपे, शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, महिला मोर्चा शहर अध्यक्ष सरस्वती चौधरी, नेरळ जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष संदीप म्हसकर, कर्जतच्या नगरसेविका स्वामींनी मांजरे, माजी नगरसेविका घुमरे यांच्यासह राहुल कुलकर्णी, प्रकाश पेमारे, शर्वरी कांबळे, ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत सुर्वे आदी सहभागी झाले होते.
खालापुरातील पाली फाटा येथे जोरदार घोषणाबाजी

खालापूर : प्रतिनिधी
भाजपच्या प्रदेश कार्यालयाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत खालापुर भाजप मंडलाच्या वतीने सोमवारी (दि. 23) दुपारी पालीफाटा येथे विज बिलांची होळी करुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रसाद पाटील, वडगांव जिल्हा परिषद अध्यक्ष संदिप पाटील, विश्वनाथ पाटील, सचिन जाधव, लवेश कर्णुक, राम ठोंबरे, अंकुश मोरे, विकास रसाळ, दत्तुबुवा मरागजे, राहुल कडव यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper