
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या महत्वपूर्ण बैठकीमध्ये मंत्र्यांना दोन महत्वाचे सल्ले दिले आहेत. वायफळ बडबड करु नका तसेच कोणत्याही नातेवाईकाला तुमच्या मंत्रीमंडळासाठी सल्लागार म्हणून नियुक्त करु नका असे सल्ले मोदींनी मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना दिले आहेत. अनेकदा प्रसारमाध्यमांसमोर एखादे वक्तव्य केल्यानंतर त्यावरुन निर्माण होणारे वाद टाळण्यासाठी मोदींनी हे सल्ले आपल्या सहकार्यांना दिल्याचे समजते. मोदींच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. प्रसारमाध्यमांमध्ये तसेच लोकांसमोर गरज नसताना नको ती वायफळ वक्तव्ये करु नये असा सल्ला मोदींनी यावेळी आपल्या सहकार्यांना दिला. तसेच सिद्ध करता येतील असेच दावे करावेत असा सल्लाही मोदींनी नेत्यांना दिल्याचे सुत्रांनी म्हटले आहे. आपल्या खात्यामध्ये किंवा मंत्रालयाअंतर्गत जवळच्या व्यक्तींना किंवा नातेवाईकांना सल्लागार म्हणून नेमू नये असा सल्लाही मोदींनी नेत्यांना दिला आहे. सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत कार्यालयात पोहचण्यासंदर्भात केलेल्या सुचनांचे काहीजणांकडून अद्यापही पालन केले जात नाही. काहीजणांना अजूनही वेळेवर कार्यालयात पोहचता येत नसून त्यांनी यासंदर्भात सुधारणा करण्याची गरज आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper