अकलूज ः प्रतिनिधी
वारकर्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकार कान असूनही बहिरेपणाची भूमिका घेत आहे. या सरकारच्या संवेदना गोठल्या आहेत, अशी टीका गुरुवारी (दि. 15) अकलूज येथे माध्यमांशी बोलताना विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. कोरोनाचे कारण देत यंदा दुसर्या वर्षीही पंढरपूरच्या आषाढी यात्रेवर कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच 17 ते 25 जुलैपर्यंत नऊ दिवस पंढरपूर व परिसरातील नऊ गावांत संचारबंदी लागू केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारचे कान उपटले. वारकर्यांबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोनदा भूमिका मांडली, परंतु हे सरकार कान असूनही बहिर्यासारखे वागत आहे, किंबहुना त्यांच्या संवेदनाच गोठल्या आहेत. त्यांच्या संवेदना जिवंत असत्या तर आज आमची मंदिरे, देव-दैवते कुलुपात राहिली नसती. त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करून आपले देव, देश, धर्म सगळे काही बासनात गुंडाळले आहे. वारकरी कोरोनाविषयक सर्व निर्बंध काटेकोरपणे पाळण्यास तयार होते, परंतु हेकेखोरपणे आम्हाला पाहिजे तसेच आम्ही वागू अशा पद्धतीने सरकारचे वारकर्यांशी वागणे राहिले आहे, असेदेखील या वेळी दरेकर यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper