Breaking News

वाशीच्या विष्णूदास भावे नाट्यगृहात अफवेमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

परराज्यात जाण्यासाठी एकच गर्दी

नवी मुंबई : बातमीदार – कोरोनाने हाहाकार माजवलेला असतानाच अफवेच्या पिकांना देखील उत आलेला आहे. याचा प्रत्यय शनिवारी (दि. 2) नवी मुंबईत आला नि वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात अर्ज करण्यासाठी नागरिकांच्या रांगा पाहायला मिळाल्या. मात्र यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला.

परराज्यात जाण्यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून पास मिळत असल्याची आवई उठल्याने लॉकडाऊनमुळे नवी मुंबईत अडकून बसलेल्या परप्रांतीयांनी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात एकच गर्दी केली. भावे नाट्यगृह प्रवेशद्वाराच्या दुतर्फा या लांबच लांब रांगा लागल्या दिसुन आल्या.

शनिवारी सकाळपासून अर्ज वाटपाची अफवा पसरल्याने नवी मुंबईतील परप्रांतीय नागरिकांनी वाशी विभाग कार्यालयाजवळ गर्दी केली होती. मात्र विभाग कार्यालयाजवळ कोविड तपासणी सेंटर असल्याने या सर्वांना तिथून हुसकावून लावण्यात आले. यामध्ये विष्णुदास भावे नाट्यगृहात अर्ज वाटप करत असल्याची बातमी पसरताच या सर्व नागरिकांनी विष्णुदास भावे नाट्यगृह गाठले. हळूहळू ही गर्दी वाढत गेली. मुख्य म्हणजे नवी मुंबई हे कोरोनाचे हॉटस्पॉट क्षेत्र ठरत असतानाच ही गर्दी वाढल्याने सर्वत्र गोंधळ उडाला. सोशल व फिजिकल डिस्टन्सिंग देखील राखले गेले नसल्याचे या गर्दीमुळे उघड झाले. तर अनेकांनी मास्क देखील तोंडाला बांधले नव्हते. त्यामुळे हादरलेल्या वाशी पोलिसांनी तातडीने भावे नाट्यगृहाकडे धाव घेतली व नागरिकांना तिथून हुसकावून लावले. इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिक का जमले? कोणी अफवा पसरवली हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला आहे.

राज्यात व परराज्यात अडकलेल्या  मजुरांना, कामगारांना व नागरिकांना आपल्या घरी जाता यावे यासाठी केंद्राने विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्या त्या पोलीस क्षेत्रांतर्गत असलेल्या डीसीपिंना परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार नागरिकांनी अर्ज करायचा आहे. त्यावर आधार कार्ड, पत्ता, फोन नंबर व कोठे जयकर आहे तो पत्ता नमूद करायचा आहे.  स्थानिक पोलीस स्थानकात अर्ज केल्यावर त्यास परवानगीदेण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या अधिकार क्षेत्रात येणार्‍या विष्णुदास भावे नाट्यगृहात ही गर्दी कशी काय जमली? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर फेक मेसेज पाठवून नागरिकांच्या जीवाशी खेळणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार परराज्यात जाण्यासाठी पालिकेच्या विभागनिहाय कार्यालयातून अर्ज देण्यात येणार होता. त्यानुसार वाशी विभाग कार्यालयात अर्ज घेण्यासाठी गर्दी जमली होती. मात्र वाशी विभाग कार्यालयाच्या बाजूला क्वारंटाइन कक्ष असल्याने हे अर्ज विष्णुदास भावे नाट्यगृहात पाठवण्यात आले होते. त्यामुळे वाशी विभागात राहणार्‍या नागरिकांनी भावे नाट्यगृहाजवळ अर्ज घेण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले.

1 मे रोजी शासनाने काढलेल्या अध्यादेशात पालिकेकडुन अर्ज वाटपाचे अतिरिक्त काम काढून ते संपूर्णपणे स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये दिले आहे. पोलीस स्थानकांतून अर्ज घेऊन तो नागरिकांनी भरायचा आहे. त्यासोबत स्वतःची कोविड टेस्ट करून मेडिकल टेस्ट रिपोर्ट अर्जासोबत द्यायचा आहे. तो अर्ज स्थानिक पोलीस स्थानकात दिल्यावर नागरिकांना आपल्या गावी जाण्याची परवानगी मिळणार आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply