डेप्युटी आरटीओ विभागाच्या उत्पन्नावर परिणाम

पनवेल : बातमीदार
आर्थिक मंदीचा फटका सर्वप्रथम वाहन उद्योगाला बसला आहे. परिणामी वाहन विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने राज्याच्या परिवहन विभागाच्या उत्पन्नावरदेखील परिणाम झाला आहे. नवी मुंबई डेप्युटी आरटीओ कार्यालयात नोंदणी होणार्या वाहनांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 30 टक्के कपात झाल्याने त्याचा नवी मुंबई आरटीओच्या महसूल वसुलीवर परिणाम झाला आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये वाहन नोंदणीतून नवी मुंबई आरटीओला अपेक्षित महसूल जमा करता आलेला नाही. गत आर्थिक वर्षामध्ये नवी मुंबई आरटीओला 296 कोटी रुपये महसूल जमा करण्याचे लक्ष्य देण्यात आले होते, मात्र आरटीओने 269 कोटी रुपये महसूल जमा केला. वार्षिक उद्दिष्टामध्ये 27 कोटींची तूट दिसून येत आहे. नवी मुंबईचे डेप्युटी आरटीओ कार्यालय स्थापन झाल्यापासून दरवर्षी उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल जमा करण्यात यशस्वी झाले आहे, मात्र नोटाबंदीच्या कालावधीनंतर दोन वर्षांपासून चित्र पालटले. दसरा-दिवाळीला वाहने खरेदी करण्याचा कल या वर्षांत दोन वर्षांपासून कमी झालेला दिसत आहे. त्याचाच परिणाम परिवहन विभागाच्या वार्षिक उत्पन्नावर होत आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये नवी मुंबई डेप्युटी आरटीओ कार्यालयाला 295 कोटी रुपये महसूल जमा करण्याचे लक्ष्य देण्यात आले, मात्र एप्रिल ते ऑक्टोबर 2019 या सात महिन्यांच्या कालावधीत नवी मुंबई आरटीओला फक्त 139 कोटींपर्यंतच मजल मारता आली. आर्थिक मंदी, निवडणुकीसह इतर कारणांमुळे नवी मुंबईत या वर्षी नेहमीच्या तुलनेत कमी वाहनांची विक्री झाली. त्यामुळे वाहनांच्या नोंदणीतून सगळ्यात जास्त महसूल मिळवून देणार्या नवी मुंबई आरटीओच्या महसुलात यंदा सुमारे 30 टक्क्यांनी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. या वर्षी 10 हजार 696 दुचाकी, चार हजार 471 चारचाकी वाहने तसेच 733 टुरिस्ट-मीटर टॅक्सी, ऑटो रिक्षा 2852, त्या खालोखाल 733 ट्रक, 666 व्हॅन व इतर वाहने अशा एकूण 20 हजार 933 वाहनांची नवी मुंबई आरटीओमध्ये नोंदणी झाली. त्यापोटी नवी मुंबई आरटीओला फक्त 139 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत म्हणजेच एप्रिल ते ऑक्टोबर 2018पर्यंतच्या कालावधीमध्ये नवी मुंबई आरटीओकडे तब्बल 24 हजार 695 इतक्या वाहनांची नोंदणी झाली होती, तसेच तिजोरीत 156 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. त्यामुळे गत आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत 3762 वाहनांची नोंदणी कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे.
दिवाळीतही कमी विक्री
दिवाळीत वाहन खरेदी करणार्यांची संख्या मोठी असते. या मुहूर्तावर मोठ्या संख्येने विविध कंपन्यांकडून विविध योजनाही जाहीर केल्या जातात. या वाहनांच्या खरेदीसाठी दिवाळीच्या आधीपासून नोंदणी केली जाते. यंदा 1 एप्रिल ते 30 ऑक्टोबर या कालावधीत नवी मुंबई आरटीओ कार्यालयात फक्त 10 हजार 696 दुचाकी वाहनांची नोंदणी झाली. मागील वर्षात हाच आकडा 12 हजार 15 इतका होता. मागच्या वर्षी चार हजार 861 इतक्या चारचाकी वाहनांची नोंदणी झाली, मात्र या वर्षी 4471 चारचाकी वाहनांची नोंदणी झाली, तर टुरिस्ट-मीटर टॅक्सी, ऑटो रिक्षा व टँकर, ट्रेलर आदी वाहनांच्या नोंदणीत मोठ्या प्रमाणात कपात झाली. वाहन नोंदणींची संख्या जर दिवसेंदिवस कमी होत गेली, तर चालू आर्थिक वर्षाच्या अखेर म्हणजेच मार्च 2020पर्यंत दिलेले उद्दिष्ट गाठणे आरटीओ विभागास कठीण जाणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper