प्रशासनाकडून झेनिथ धबधबा परिसराची पाहणी
खोपोली : प्रतिनिधी
मंगळवारी घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी झेनिथ धबधबा व आजूबाजूच्या परिसराची बुधवारी (दि. 29) सकाळी पाहणी केली.
वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी झेनिथ धबधब्यावर गेलेल्या तीन पर्यटक मंगळवारी संध्याकाळी पाताळगंगा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली होती. यापैकी दोघांचे मृतदेह सापडले होते, मात्र एका मुलीचा शोध होता. बुधवारी सकाळी शोधकार्य सुरू करण्यात आले. मुळगाव वासरंग भागात अपघात ग्रस्त मदत टीमचे गुरू साठीलकर राजेश पाटे, अमोल कदम, हनीफ करंजीकर व इतरांनी शोध कार्य सुरू ठेवले. तर सावरोली पुलाजवळ अग्निशामक दलातर्फे शोधमोहीम सुरू होती, मात्र दुपारपर्यंत वाहून गेलेली बालिका सापडली नाही. त्यामुळे पालकांच्या चिंतेत वाढ झाली.
दरम्यान, धबधब्याकडे जाणार्या मुख्य मार्गावर बॅरिकेडींग करण्यात आले. तसेच दोन पोलीस कर्मचारी व नगरपालिकेचे दोन कर्मचारी मुख्य रस्त्यावर नेमण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कर्जत प्रातांधिकार्यांचा मनाई आदेश सूचना फलकही लावण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीबाबत देण्यात आलेल्या इशार्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी धबधबा, नदी, समुद्रकिनारे, गड, किल्ले, परिसरात जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर व पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper