Breaking News

विकासकामांतील स्टीलचोरीच्या घटनांमध्ये वाढ

पोलादपूर तालुक्यात चौपदरीकरणासोबतच विविध विकासकामांची रेलचेल सुरू आहे. असे असले तरीदेखील या विकासकामांसाठी वापरण्यात येणार्‍या सामानाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कारण विविध कामांसाठी वापरण्यात येणारे सामान हे त्याच ठिकाणी उघड्यावर ठेवले जाते. त्यामुळे या सामान चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अनेक चोरीच्या घटनांबाबत  पोलीस स्थानकात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, मात्र तक्रार दाखल केल्यानंतर पुढे तपासाबाबत कोणतीही विशेष हालचाल झालेली नाही. त्यामुळे याबाबत पोलीस प्रशासनासह विकसकांनीही तेवढ्याच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. पोलादपूर तालुक्यातील रस्त्यालगतचे क्रॅश बॅरियर्स तसेच अन्य लोखंडी सामान गायब होण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून सर्रासपणे सुरू आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या रस्त्यालगतचे खांब काढून बाजूला ठेवून नवीन रस्त्यालगत विजेचे पर्यायी खांब उभारण्यात आले असताना, त्या खांबांची वेळीच दिवील रस्त्यावरील तुर्भे सबस्टेशनच्या आवारात वाहतूक न झाल्याने चोरीला जाण्याचा प्रकार वाढला आहे. त्यामुळे याबाबत विकसकांनीही तत्परता दाखविणे गरजेचे आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून गेल्या काही महिन्यांपासून ट्रक्स, कंटेनर्समधून काही प्रमाणात स्टील परस्पर संगनमताने काढणे, जुने विजेचे खांब कापून त्यांची वाहतूक करणे, दरीलगतचे क्रॅश बॅरियर्स दरीत ढकलून त्याची परस्पर वाहतूक करून विक्री करणे अथवा त्याच क्रॅश बॅरियर्सना रंग लावून ठेकेदाराला नवीन क्रॅश बॅरियर म्हणून विकणे आदी प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अशा चोरीच्या घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याकडे गांभिर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील बांधकाम साहित्याची चोरी होत असल्याचा संशय तेथील पोटठेकेदार असलेल्या एसडीपीएल कंपनीला आला होता. त्यांनी तातडीने याबाबत पोलादपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाने काढलेल्या माहितीवरून, एका अज्ञात आरोपीने गुरांच्या गोठ्यामध्ये हे चोरून आणलेले स्टील लपवून ठेवल्याचे आढळून आले. गुप्तवार्ता विभागाने या बांधकाम साहित्याच्या चोरीवर बारकाईने लक्ष ठेवले असता या गोठ्यामध्ये अंदाजे 36 हजार रूपये किमतीचे ठेवलेले साहित्य हस्तगत केले. पार्टेकोंड ते सावंतकोंड दरम्यानचा एक लोखंडी पूल काही दिवसांपूर्वी चोरीला गेल्याची तक्रार नगरपंचायत पोलादपूरकडून पोलादपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर रात्रीच्या अंधारात काही अज्ञातांनी याच ठिकाणी पुलाचे अवशेष आणून टाकले. त्यामुळे आरोपीला अटक करण्याऐवजी मुद्देमाल छिन्नविछिन्न स्वरूपात घटनास्थळी पुन्हा हजर झाल्याने अज्ञात आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई होण्याऐवजी त्याचा बचाव करण्यासाठी झालेल्या प्रयत्न होत असल्याचा आरोप सध्या जागरूक नागरिकांमधून करण्यात येत आहे. पोलादपूर नगरपंचायतीच्या ताब्यातील सावंतकोंड, पार्टेकोंड प्रभाग क्रमांक 1मध्ये नळ पाणीपुरवठा करण्याची पाईपलाइन चोरीला गेल्याची तक्रार अमोल भुवड यांनी पोलादपूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्याकडे दिली आहे. यापूर्वी याच ठिकाणी असलेल्या लोखंडी पुलाची चोरी झाल्यानंतर एफआयआर दाखल होताच पुलाचे तुकडे पुन्हा घटनास्थळी आढळून आले होते. अमोल भुवड यांनी त्या घटनेसंदर्भातील आरोपी अटक करण्यासाठी उपोषणाचा इशारा दिला असताना पुन्हा चोरीची घटना झाल्याने शहरामध्ये खळबळ उडाली आहे. पोलादपूर तालुक्यात भंगार माफियांनी अनेक विकासकामे खोदून चोरल्याच्या घटना गेल्या वर्षभरात झाल्या असून त्याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे. पोलादपूर नगरपंचायतीच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक 1मध्ये दोन महिन्यांपूर्वी एक लोखंडी पूल कापून चोरून नेण्याची घटना पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्याने चर्चेत आली होती, मात्र गुन्हा दाखल होऊन आरोपी पकडण्याआधीच तुकडे तुकडे केलेला लोखंडी पूल घटनास्थळी अज्ञात व्यक्तींनी आणून ठेवल्याने याबाबत कोणताही तपास झाला नाही. या घटनेबाबत सर्वश्रुत आरोपींची चर्चा पोलादपूर शहरात होत असताना आता याच सावंतकोंड पार्टेकोंड परिसरातील नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेली भूमिगत पाईपलाइन ग्रामस्थांना समजून आले. त्यामुळे अ‍ॅड. सचिन गायकवाड, नगरसेवक स्वप्नील भुवड आणि अमोल भुवड यांनी मुख्याधिकारी महादेव रोडगे यांना या प्रकरणी पोलीस तपास होऊन कारवाई होण्याकामी एफआयआर दाखल करण्यासाठी निवेदन दिले.पोलादपूर तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यालगतच्या रेलिंगचे कठडे, पुलाचे कठडे, लोखंडी पूल, स्मशानाचे आयबीम लोखंडी खांब, वादळामुळे कोसळलेले विजेचे लोखंडी खांब आदी विकासकामांशी निगडीत वस्तूंची भंगार माफियांनी सर्रास चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून याबाबत प्रशासनाकडून फारसे गांभिर्याने घेतले जात नसल्याने चोरांची उदयास आलेली नवी टोळी तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. याखेरीज पोलादपूर तालुक्यातील स्मशानशेड तसेच अन्य लोखंडी साकव, रस्त्यालगतचे लोखंडी पूल आणि नळयोजनांच्या पाईपलाइनची चोरी वेळोवेळी झाल्याचे उघड झाले असूनही सर्वच प्रकरणांचा अद्यापही तपास सुरू आहे. त्यामुळे आता विकासकामांमध्ये वापरल्या जाणार्‍या वस्तूंच्या सुरक्षेबाबतही कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याने चोरीच्या घटना अशाच घडत राहतील असे नागरिकांमधून बोलले जात आहे.

-शैलेश पालकर

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply