कोर्लई येथील बाळासाहेबांच्या शिवसेनेतील ग्रामपंचायत उमेदवार आक्रमक
मुरूड ः प्रतिनिधी
गेली अनेक वर्ष कोर्लई ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आहे. सरपंच प्रशांत मिसाळ यांनी विकास न करता भकास केला आहे. अनेक कामात भ्रष्टाचार केला आहे. याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला आहे. भ्रष्टाचार मुक्त ग्रामपंचायत असावी म्हणून आम्ही कोर्लई ग्रामपंचायतीची निवडणूक लढवत असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये कोर्लई ग्रामपंचायतीमधील बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सरपंचपदाचे उमेदवार दीपाली म्हात्रे, सदस्यपदाचे उमेदवार उपेंद्र बलकवडे व सॅन्ड्रा अॅलेक्स रोझारिओ यांनी केले आहे. या वेळी या पत्रकार परिषदेत जिल्हा संघटिका शुभांगी करडे, जिल्हा उपप्रमुख भरत बेलोसे, तालुका उपप्रमुख मनोज कमाने, भगीरथ पाटील, सी. एम. ठाकूर, स्वस्तिक ठाकूर,विकी वेगास, ख्रिश्चन समाजाचे अध्यक्ष ज्याव रुझारिओ, सचिव रायफल लुवीज वेगस आदी उपस्थित होते. स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्यावर ख्रिश्चन समाजाचे विशेष प्रेम असून सर्व बांधव त्यांच्यासोबत राहणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. ख्रिश्चन समाजाच्या सभेत आमदारांचा आदर सर्वांनीच राखला असून येथे कोणताही गोंधळ अथवा त्यांचा अवमान होणारी कोणतीही घटना घडलेली नाही. समाज माध्यमात कोर्लई येथे झालेल्या कार्यक्रमाची बातमी विरोधकांनी विरोधात देऊन गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्थानिक आमदारांनी आज कोर्लई ग्रामपंचायतीसाठी लाखो रुपयांचा निधी वितरित केल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, मात्र येथील जनता या कृत्याबद्दल त्यांना माफ करणार नसून आमच्या पक्षाचे सरपंच व सदस्य मोठ्या प्रमाणात निवडून येणार असल्याचा विश्वास जिल्हा संघटिका शुभांगी करडे यांनी व्यक्म केला आहे. ख्रिचन समाजाचे अध्यक्ष ज्याव रुझारिओ यांनी सांगितले की, समाज माध्यमात आमदारांविरोधात चुकीचे व खोडसाळ वृत्त दिले असून याचा आम्ही निषेध करीत आहोत. या निवडणुकीत ख्रिश्चन समाजाशी बेलदार व आदिवासी संघाचा पाठिंबा आम्हाला मिळाला असल्याची माहिती त्यांनी दिली.
RamPrahar – The Panvel Daily Paper