
पनवेल ः प्रतिनिधी
उरण पूर्व विभागात गेले काही दिवस विजेचा लपंडाव सुरू असून दोन-दोन दिवस वीज गायब होणे, अचानक वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. त्यात सर्वांच्या लाडक्या बाप्पाचा उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तरीही वीज महावितरण कंपनी कोणत्याही उपाययोजना करीत नाही.
कोरोनाच्या महामारीत ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले आकारली जात आहेत. ती कमी करण्यात यावीत यासाठी समस्यांनी त्रस्त असलेल्या उरण पूर्व भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 18) उरण येथील महावितरण कार्यालयावर धडक देत दोन दिवसांत उपाययोजना केल्या नाहीत, तर तीव्र जनआक्रोश आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यातून निर्माण होणार्या परिस्थितीला महावितरण कंपनी जबाबदार असेल, असेही त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पुनाडे आठ गाव पाणी कमिटी, उरण पूर्व विभाग मित्र परिवार व सामाजिक कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने अतिरिक्त कार्यकारी अभियंता उपविभाग महावितरण कंपनी उरणवर धडक मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी मागील तीन महिन्यांपासून उरण पूर्व विभागाचा वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. वर्षानुवर्षे या विभागाची आणि तालुक्याची विजेची समस्या आहे. त्यात आता वाढ होऊन नागरिकांना विजेविना दोन-दोन दिवस राहावे लागत आहे.
वेळोवेळी आपणास त्यासाठी संपर्क करतो, परंतु आपण त्यावर कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही. मागील आठवड्यात तर खूप वेळा रात्रभर वीज गायब होती. तुम्हाला जमत नसेल तर आम्ही आपणास मदत करू आणि उपाययोजना सुचवू पण आमच्या तालुक्याची विभागाची विजेची समस्या कायमस्वरूपी निकालात काढा. येत्या दोन दिवसांत विजेसंदर्भात उपाययोजना करून जनतेला दिलासा द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.
वादळामुळे विभागात जे विजेचे खांब पडले आहेत त्यांना आपण अद्यापपर्यंत काही ठिकाणी पूर्ववत केलेले नाही. ते पूर्ववत करण्यात यावेत व पावसाळ्यानंतर काही ठिकाणी सडलेल्या केबल लवकरात लवकर बदलण्यात याव्यात. कोविडच्या काळात जी भरमसाठ बिले देण्यात आली ती कमी करण्यात येऊन जनतेला दिलासा देण्यात यावा. विजेच्या लपंडावाची समस्या निकाली निघाली नाही तर पुढच्या 15 दिवसांत उरण पूर्व भागातील जनतेच्या वतीने जनआक्रोश आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन उरण महावितरण कंपनीचे आतिरिक्त अधिकारी चौंढे यांना देण्यात आले. या वेळी गोरख ठाकूर, पत्रकार दिलीप पाटील, आठ गाव पाणी कमिटीचे कार्याध्यक्ष गुरुनाथ गावंड यांच्या समवेत गावचे सरपंच व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनातून निर्माण होणार्या परिस्थितीला महावितरण कंपनी जबाबदार असेल, असेही निवेदनात म्हटले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper