सीकेटी विद्यालयातर्फे क्षेत्रभेटी
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय मराठी प्राथमिक विभागाच्या वतीने बुधवारी (दि. 16) इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांची पोस्ट ऑफिस, व गुरुवारी (दि. 17) इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची अभ्युदय बँक नवीन पनवेल येथे क्षेत्रभेट देण्यात आली. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिसचे व्यवहार कसे चालतात? तार, पार्सल, पत्रे, तिकिटे, मनीऑर्डर म्हणजे काय? त्याचप्रमाणे मेल व टपाल या विषयी तेथील कर्मचारी हेमंत मोरे (पोस्ट मास्तर) व कृतिका तेळवणे यांनी माहिती दिली तसेच सुकन्या योजना याबद्दल माहिती सांगितली. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना बँकेचे व्यवहार कसे चालतात? पैशांची देवाणघेवाण कशी चालते? बँक कोणकोणत्या प्रकारची कर्ज देते? विद्यार्थ्यांना नवीन खाते उघडायचे असल्यास कोणकोणती कागदपत्रे लागतात? अशा अनेक प्रकारची माहिती अभिजित काटे व प्रवीण मालणकर यांनी विद्यार्थ्यांना दिली. मोठी रक्कम असल्यास ती मशीनमध्ये कशाप्रकारे मोजली जाते याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मानकर, सहल प्रमुख सौ. मोटे, इयत्ता तिसरी व चौथीचे वर्गशिक्षक तसेच शाळेचे शिपाई उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper